टीम इंडियाने 2-0 ने वनडे सिरीज गमावली; श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची पोलखोल

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगला होता. मात्र या सामन्यातही टीम इंडियाचा 110 रन्सने पराभव झाला. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 7, 2024, 08:25 PM IST
टीम इंडियाने 2-0 ने वनडे सिरीज गमावली; श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची पोलखोल title=

India vs Sri Lanka 3rd ODI: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगला होता. मात्र या सामन्यातही टीम इंडियाचा 110 रन्सने पराभव झाला. श्रीलंकेने तिसऱ्या वनडे सामन्यात 249 रन्सचं आव्हान टीम इंडियाला दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करेपर्यंत टीम इंडियाच्या नाकीनऊ आल्या. अखेरीस संपूर्ण टीम इंडिया 138 रन्सवर ऑलआऊट झाली. या पराभवामुळे टीम इंडियाने वनडे सिरीज 2-0 अशी गमावली. 

श्रीलंकेकडून भारताला 249 रन्सचं आव्हान

अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला 249 रन्सचं लक्ष्य दिलं. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून 248 रन्स केले. भारताकडून पहिला वनडे सामना खेळणाऱ्या रियान परागने 54 रन्समध्ये 3 विकेट्स घेतले. श्रीलंकेसाठी पथुम निसांका आणि फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी 89 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र, फर्नांडोचे शतक हुकलं आणि तो 96 धावा करून बाद झाला. कामिंडू मेंडिसने 19 चेंडूत 23 धावांची खेळी केली. 

टीम इंडियाचे फलंदाज फेल

श्रीलंकेने दिलेल्या 249 रन्सचं आव्हान टीम इंडियासाठी कठीण गेलं. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा एकदा फेल गेले. रोहित शर्माने या सामन्यातही चांगली सुरुवात करून दिली. मात्र 35 रन्सवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

पहिला सामना झाला होता टाय

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली होती. यातील पहिला सामना टाय झाला. दोन्ही संघांनी सामना स्कोर केल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियावर 32 धावांनी विजय मिळवला होता. अशातच आता तिसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाला पराभव झाल्याने आता टीम इंडियाची नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात असताना टीम इंडियाचा पराभव झालाच कसा? असा सवाल क्रिडाप्रेमी विचारत आहेत.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.