Ravi Shastri blasts Team India And BCCI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या (WTC Final) पहिल्या 2 दिवसांमध्ये हिरवळ असलेल्या ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अगदी सहज धावा केल्या. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला ही किमया करता आल्याचं चित्र सामन्याचा चौथा दिवस संपला तरी पहायला मिळत नाही. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर तसेच काही प्रमाणात रविंद्र जडेजा वगळता भारतीय फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीचा समावेश असलेली भारताची टॉप ऑर्डर पहिल्या डावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. विराट, रोहित आणि चेतेश्वर या तिघांनी पहिल्या डावात मिळून 71 धावा केल्या. सलामीवरांच्या या सुमार कामगिरीचा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) चांगलाच समाचार घेतला आहे. थेट इंडियन प्रिमिअर लिगचा उल्लेख करत शास्त्रींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही समाचार घेतला आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी पूर्णपणे निराशा केली. भारताच्या सलामीच्या 4 खेळाडूंपैकी 2 खेळाडू हे काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या आयपीएलच्या 16 व्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. असं असूनही त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही हे पाहून शास्त्री चांगलेच संतापले आहेत. भारतीय संघासाठी खेळायचं आहे की आयपीएल खेळायचं आहे हे भारतीय क्रिकेटपटूंनी ठरवून घेतलं पाहिजे असं रोखठोक मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं आहे.
"तुमचा प्राधान्यक्रम तुम्ही निश्चित केला पाहिजे. बरोबर आहे ना? इथे प्राधान्यक्रम काय आहे? भारतीय संघ की फ्रॅन्चायझी क्रिकेट? तुम्हाला हे निश्चित करावं लागेल. जर तुमचं उत्तर फ्रॅन्चायझी क्रिकेट असेल तर तुम्ही हे (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) विसरुन जा. मात्र जर हे (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) असेल तर या खेळाची जबाबदारी घेणाऱ्या बीसीसीआयने याची काळजी घेतली पाहिजे. आयपीएलच्या करारामध्ये एक अट हवी की जर त्यांना एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याच्या उद्देशातून स्पर्धेतून बाहेर काढायचं असेल तर तसं करता यायला हवं," असं रवी शास्त्रींनी 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना म्हटलं आहे.
"आधी ही अट घातली पाहिजे आणि नंतर त्यांनी (बीसीसीआयने) फ्रेन्चायझींना विचारावं की त्यांना किती गुंतवणूक करायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे या खेळासंदर्भातील सर्व अधिकार आहेत. तुम्ही देशातील क्रिकेटचं नियमन करता," असं म्हणत शास्त्रींनी बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत. यापूर्वीही रवी शास्त्रींनी या मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी वर्कलोड मॅनेजमेंट केलं पाहिजे असं शास्त्रींनी आयपीएलच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही म्हटलेलं.