मुंबई : आयसीसीनं जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. २०१७च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमनं उल्लेखनीय कामगिरी करत फायनल गाठली होती. चांगली कामगिरी केल्यामुळे आम्ही चौथ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पुढच्या मॅचमध्ये यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल, असं कर्णधार मिथाली राज म्हणाली आहे.
वनडे क्रमवारीमध्ये भारताचे ११६ पॉईंट्स आहेत. तर न्यूझीलंड ११८ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या पॉईंट्सच्या अगदी जवळ आम्ही आहोत. लवकरच न्यूझीलंडच्या पुढे जायचं आमचं लक्ष्य असेल, अशी प्रतिक्रिया मिथालीनं दिली आहे.
वनडे क्रमवारीमध्ये १२८ पॉईंट्ससह इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचेही १२८ पॉईंट्सच आहेत. डेसिमल पॉईंट्स कमी असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग पहिल्या क्रमांकावर आहे. तर मिथाली राज दुसऱ्या क्रमांकावर, हरमनप्रीत कौर सहाव्या आणि पूनम राऊत १४व्या क्रमांकावर आहे.
बॉलर्सच्या क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेची मरीझेन कॅप पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताची झुलन गोस्वामी दुसऱ्या, एकता बिश्त ११व्या, शिखा पांडे १२व्या राजेश्वरी गायकवाड १६व्या क्रमांकावर आहे.