INDvsAUS: मयंक अग्रवालचा अपमान केल्यानंतर कॉमेंटेटरची माफी

भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा एका नव्या वादानं तोंड वर काढलं आहे.

Updated: Dec 26, 2018, 10:25 PM IST
INDvsAUS: मयंक अग्रवालचा अपमान केल्यानंतर कॉमेंटेटरची माफी title=

मेलबर्न : भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा एका नव्या वादानं तोंड वर काढलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर केरी ओकीफ यानं मयंक अग्रवालचा अपमान केल्यानंतर माफी मागितली आहे. मेलबर्नमधल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ओकीफनं लाईव्ह कॉमेंट्री करताना मयंक अग्रवालच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ओकीफनं १९७१ ते १९७७ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून २४ टेस्ट आणि २ वनडे मॅच खेळल्या आहेत.

रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालनं केलेलं त्रिशतक रेल्वे कॅन्टीनच्या कामगारांविरुद्ध केलं होतं. त्या टीममध्ये शेफ आणि वेटरही होते, असं ओकीफ कॉमेंट्री करताना म्हणाला. यावेळी ओकीफ याच्याबरोबर शेन वॉर्न आणि मार्क वॉदेखील होते. मार्क वॉनं देखील मयंक अग्रवालवर निशाणा साधला. मयंक अग्रवालची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली ५० (४९.९८)ची सरासरी ही ऑस्ट्रेलियात ४० सारखी आहे, असं मार्क वॉ म्हणाला. मयंक अग्रवालनं २०१७ साली महाराष्ट्राविरुद्धच्या मॅचमध्ये ३०४ रनची खेळी केली होती. मयंकनं २०१७-१८ च्या रणजी मोसमात ८ मॅचमध्ये १०५.४५ च्या सरासरीनं १,१६० रन केले होते. यामध्ये ५ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश होता.

मयंक अग्रवालकडून बोलती बंद

एकीकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरकडून हेटाळणी सुरु असतानाच मयंक अग्रवालनं मात्र त्याच्या बॅटनं सगळ्यांची बोलती बंद केली. पदार्पणाच्या मॅचमध्येच अग्रवालनं १६१ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.

ओकीफचा माफीनामा

कॉमेंट्रीदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर केरी ओकीफ यानं माफी मागितली आहे. अग्रवालनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेल्या रनचा दाखला देताना माझी जीभ घसरली. मयंक अग्रवालची कामगिरी कमी दाखवण्याचा माझा उद्देश नव्हता. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ओकीफ म्हणाला. मार्क वॉ यानंही ट्विटरवरून मयंक अग्रवालच्या कामगिरीचं कौतुक केलं.

मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर २१५/२ असा आहे. चेतेश्वर पुजारा ६८ रनवर नाबाद तर कर्णधार विराट कोहली ४७ रनवर नाबाद खेळत आहे. ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजची पहिली टेस्ट भारतानं ३१ रननी जिंकली, तर दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १४६ रननी विजय झाला. त्यामुळे ही टेस्ट सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. ही टेस्ट मॅच जी टीम जिंकेल ती टीम सीरिजमध्ये अजेय आघाडी घेईल.