मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी टी-ट्वेन्टी मॅच आज राजकोट येथे रंगणार आहे. दिल्लीमध्ये झालेली पहिली टी-ट्वेन्टी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियासमोर कमॅबॅकचं आव्हान असेल. पहिल्या टी-ट्वेन्टीमध्ये भारताच्या बॉलिंगमध्ये अनुभवाची कमतरता भासली. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. तर विकेटकीपर रिषभ पतंलाही अजून काही सूर गवसलेला नाही.
दरम्यान मिडल ऑर्डरसाठी टीम इंडियात चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. शाकिब अल हसनच्या गैरहजेरीत बांग्लादेशची टीम डगमगलेली नाही हे पहिल्या टी-ट्वेन्टीमध्ये पाहायला मिळालं. आजच्या मॅचवर 'महा'चक्रीवादळाचं सावट आहे. वादळ गुजरात किनाऱ्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्यानं आजची मॅच होणार का असा प्रश्न फॅन्सला पडला आहे.
पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. भारताविरुद्ध बांगलादेशचा हा पहिलाच टी-२० विजय आहे. भारताने दिलेलं १४९ रनचं आव्हान बांगलादेशने १९.३ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
खलील अहमदच्या १९व्या ओव्हरमध्ये मुशफिकुर रहीमने लागोपाठ ४ फोर मारले आणि मॅच फिरवली. या ओव्हरमध्ये बांगलादेशने १८ रन काढल्या. यानंतर बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त ४ रनची गरज होती.