इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा पराभव निश्चित? पाहा टीम इंडियाची आकडेवारी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी (India vs England Test Series 2021) सामना हा 2 सप्टेंबरपासून द ओव्हलमध्ये (The Oval) खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Aug 31, 2021, 10:45 PM IST
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा पराभव निश्चित? पाहा टीम इंडियाची आकडेवारी title=

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी (India vs England Test Series 2021) सामना हा 2 सप्टेंबरपासून द ओव्हलमध्ये (The Oval) खेळवण्यात येणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी 1 सामना जिंकलाय. तर 1 मॅच ड्रॉ झालीये. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. दरम्यान हा चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. मात्र जिंकणार दोन्हीपैकी एक संघ. टीम इंडियाला या मैदानात विजय मिळवणं जवळपास अवघड समजलं जात आहे. (india vs england test series 2021 head to head records at kennington oval london) 

टीम इंडियाला गेल्या 50 वर्षात एकदाही ओव्हलवर कसोटी सामना जिंकता आलेला नाही. टीम इंडियाने ओव्हलवर अखेरचा सामना हा 1971 मध्ये जिंकला होता. त्यामुळे विराटसेनेला ओव्हलवर विजय मिळवण्यासाठी तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागेल. टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात पराभव झाला. त्यामुळे मनोधैर्य कुठेतरी कमी झालंय. तर इंग्लंडचा विश्वास दुणावलेला आहे. त्यात इंग्लंडला घरच्या अनुकल परिस्थितीचा फायदा आहे. मात्र तरीही टीम इंडिया या सामन्यात इंग्लंडवर वरचढ ठरण्यासाठी नक्कीच रणनिती आखेल.  

अशी आहे आकडेवारी  

टीम इंडियाने आतापर्यंत द ओव्हलवर इंग्लंड विरुद्ध एकूण 13 कसोटी सामना खेळले आहेत. यामधून केवळ 1 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यात इंग्लंडने भारतावर मात केली आहे. सोबतच 7 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने 1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा एकमेव सामना जिंकला होता. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. भागवत चंद्रशेखर हे विजयाचे शिल्पकार ठरले होते. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 173 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र त्यानंतर टीम इंडियाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. 

चिंता वाढवणारी बाब म्हणजे टीम इंडियाचा या मैदानावरील शेवटच्या 3 सामन्यात पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे 3 पैकी 2 सामन्यात भारताला डावाने पराभव स्वीकारावा लागला.   

अशी आहे टीम इंडियाची कामगिरी

टीम इंडियाने द ओव्हलवर पहिला कसोटी सामना हा 1936 खेळला होता. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर 1946 आणि 1952 मध्ये झालेल्या सामने हे अनिर्णित राहिले होते. त्यानंतर 1959 उभयसंघ आमनेसामने आले. या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा डाव आणि 27 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1971 मध्ये दोन्ही टीममध्ये टेस्ट सामना खेळवण्यात आला. 

यानंतर भारताने 1971 मध्ये द ओव्हलमध्ये पहिला वहिला विजय साजरा केला. त्यानंतर पुढे 1979, 1982, 1990, 2002 आणि 2007 मध्ये झालेले सामने हे अनिर्णित राहिले. मात्र त्यानंतर 2011, 2014 आणि 2018 मध्ये झालेल्या तिन्ही सामन्यात इंग्लंने भारतावर विजय मिळवला. या मैदानात टीम इंडियाने अखेरचा कसोटी सामना हा 2018 मध्ये खेळला होता. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर 118 धावांनी विजय मिळवला. 

विशेष म्हणजे या सामन्यात केएल राहुल आणि रिषभ पंतने शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सीरिजमधील चौथा सामना हा या मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळे टीम इंडिया या चौथ्या कसोटीत कशा प्रकाराची कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.