मुंबई: अजिंक्य राहाणे ज्याने न्यूझीलंड विरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. न्यूझीलंड विरुद्धचा पहिला सामना अनिर्णयक ठरला. तर दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या काही सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी पाहता पुजारा आणि रहाणे यांची कसोटी कारकीर्द धोक्यात असल्याचं दिसत आहे.
33 वर्षाच्या अजिंक्य राहाणेनं 79 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 कसोटी सामन्यात तो कर्णधार राहिला होता. रहाणेच्या नेतृत्वाखाली एकतर टीम इंडियाने सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला. ही रहाणेची जमेची बाजू आहे. मात्र फलंदाजीबाबत रहाणेची बॅट म्हणावे तेवढी मैदानात चालताना दिसली नाही. गेल्या काही दौऱ्यांमध्ये त्याचा फॉर्म खराब राहिला आहे.
इंग्लंड सीरिज असो किंवा न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना रहाणेनी तेवढी विशेष कामगिरी केलेली दिसली नाही. एकेकाळी डळमळीत होत असलेल्या टीम इंडियाला याच रहाणेनं आपल्या चांगल्या फॉर्मनं उभारी दिली होती. आता रहाणेची बॅट तेवढी चांगली चालत नसल्याचं दिसत आहे.
दुसरीकडे श्रेयस अय्यरने पदार्पणातच आपलं शतक झळकवलं. त्यामुळे आता टीम इंडियासाठी श्रेयस अय्यर हा देखील एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रहाणे ऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
अजिंक्य राहणेच्या रेकॉर्ड्स विषयी बोलायचं झालं तर त्याने 79 कसोटी सामन्यात 39.30 च्या सरासरीने 4795 धावा केल्या आहेत. रहाणेच्या नावावर 12 शतकं आणि 24 अर्धशतकं आहेत. परदेशातील दौऱ्यांमध्ये राहाणेनं 3087 धावा केल्या आहेत. तर घरच्या मैदानात 1644 धावा केल्या आहेत.
2021 मध्ये 12 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 19.57 च्या सरासरीने केवळ 411 धावा केल्या आहेत. या फॉर्ममुळेच त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रहाणेला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.