हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनं दणदणीत विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये ३-०ची विजयी आघाडी घेतली. यानंतर आता शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्याऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
भारताला सीरिज जिंकवून दिल्यानंतर विराट कोहली न्यूझीलंडवरून रवाना झाला आहे. न्यूझीलंडवरून परत जातानाचा एक फोटो विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही आहे. विराट आणि अनुष्कानं विमानाबाहेर हा फोटो काढला आहे. आम्ही चाललो, असं कॅप्शन विराटनं या फोटोला दिलं आहे. विराट-अनुष्का न्यूझीलंडवरून निघाले असले, तरी ते परत भारतात येणार आहेत का दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
Away we go #travelswithher pic.twitter.com/KnDhMbAG3G
— Virat Kohli (@imVkohli) January 29, 2019
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्रिकेट खेळत असल्यामुळे विराटला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय टीम प्रशासन, निवड समिती आणि बीसीसीआयनं घेतला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतात होणाऱ्या सीरिजमध्ये विराट खेळेल. २४ फेब्रुवारीपासून या सीरिजला सुरुवात होईल. या दौऱ्यामध्ये दोन टी-२० आणि पाच वनडे मॅचची सीरिज होईल.
याआधी २०१८ साली वेस्टइंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी आणि सप्टेंबरमध्ये युएईत झालेल्या आशिया कपमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मानंच भारताचं नेतृत्व केलं होतं.
२०१९ मध्ये होणारा वर्ल्ड कप लक्षात घेता विराट कोहलीला ठराविक सीरिजमध्येच खेळवलं जात आहे. मे ते जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये ५० ओव्हरचा वर्ल्ड कप होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात २४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीला २ टी-२० मॅच होतील. यानंतर २ मार्चपासून ५ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल.
ऑस्ट्रेलियाची सीरिज संपल्यानंतर आयपीएल २०१९ ला सुरुवात होईल. आयपीएल संपल्यानंतर लगेच भारत वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होईल.