मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला मदर ऑफ ऑल क्रिकेटींग बॅटल असं म्हटलं जातं. आशिया चषकात या दोघांमध्ये सुपरहिट मुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबल्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट चाहत्यांना असते. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येत आहेत. गेल्या पाच सामन्यात दोन्ही संघामध्ये अपेक्षेप्रमाणे काँटे की टक्कर पहायला मिळाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून सपाटून मार खावा लागला होता. फकर झमाननं १०६ चेंडू ११४ धावांची तुफानी खेळीत करत पाकिस्तानला विजय साकारुन दिला होता. पाकिस्ताननं ३३९ धावांचं डोंगराएवढं आव्हान भारतीय संघासमोर ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना भारतीय संघ १५८ धावांवरच गारद झाला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला धुळ चारली होती. सामन्यात पावसाचा व्य़त्यय आल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ विजयी झाला होता. रोहित शर्मानं ९१ धावांची खेळी करत टीम इंडियाला विजय सुकर करुन दिला होता. १२४ धावांनी भारतीय संघानं या सामन्यात बाजी मारली होती.
आशिया चषकात भारतीय संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. भारतानं या सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखन पराभव केला होता. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी सारी शस्त्र म्यान केली होती. विराट कोहलीनं झुंजार खेळी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
टी-20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली होती. पाकिस्तानं भारतासमोर विजयासाठी ११९ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीनं शानदार ५५ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
विश्वचषकातील या हाय व्होल्टेज मुकाबल्याच्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पाकिस्तानसमोर विजयासाठी ३०१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २२४ धावांवर गारद झाल होता. विराट कोहलीनं १०७ धावा या सामन्यात केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना वगळता पाकिस्तानला भारतावर कुरघोडी करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे आशिया चषकाच्या या सामन्यात भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल.