केप टाऊन : भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला ५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय टीम परदेशातल्या जलद खेळपट्टीवर क्रिकेट खेळणार आहे. परदेशातल्या खेळपट्ट्यांवर यापूर्वी भारताचं प्रदर्शन फारसं चांगलं झालेलं नाही. पण दक्षिण आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळाचा भारताची कामगिरी चांगली व्हायला मदत होऊ शकते.
मागच्या काही वर्षांपासून आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळामुळे खेळपट्टी तयार करण्यात पिच क्युरेटरना अडचण येत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये नागरिकांना दिवसाला ८७ लिटरपेक्षा जास्त पाणी वापरायला परवानगी नाही.
केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलची सुविधा आहे. बोअरवेलच्या पाण्यानं आम्ही खेळपट्टीवर पाणी मारलं जात आहे. पण जलद खेळपट्टी तयार करण्यासाठी खेळपट्टीवर पावसाच्या पाण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया क्युरेटर इवान फ्लिंट यांनी इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणलं आहे.
पाणी न टाकल्यामुळे खेळपट्ट्या कोरड्या होतात तसंच गवतही या खेळपट्टीवर राहू शकत नाही. गवत नसल्यामुळे खेळपट्टींना भेगा पडतात, ज्याचा फायदा स्पिनर्सना मिळू शकतो. अशा खेळपट्ट्या भारतात असल्यामुळे भारतीय टीमला आफ्रिकेविरुद्ध खेळणं सोपं जाऊ शकेल.