मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) टी-20 मालिकेनंतर 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. यासाठी भारतीय कसोटी संघाचे खेळाडू चंदीगडला पोहोचले आहेत. मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था चंदीगड येथील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. शनिवारी टीम इंडियाच्या कसोटी संघाचे खेळाडू स्टेडियममध्ये सरावासाठी निघणार होते. खेळाडू बसमध्ये चढण्यापूर्वी बसची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, बसमध्ये दोन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
बसमध्ये सापडलेली रिकामी काडतुसे पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंना स्टेडियमकडे सोडणाऱ्या बसमध्ये सापडलेली ही काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पिस्तुलाची ही काडतुसं असल्याचं बोललं जात आहे. खेळाडूंच्या प्रवासासाठी तारा ब्रदर्सची ही बस आयटी पार्कमधील हॉटेल ललितच्या बाहेर उभी होती. जिथे दोन्ही संघातील खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काडतुसे सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तेथे शोध घेतला.
यासोबतच मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, जयंत यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत यांसारखे खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हॉटेल ललितमध्ये थांबले होते. विराट कोहली आणि ऋषभ पंतही शनिवारीच संघात सामील झाले आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या T20 मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, याच मैदानावर टी-20 मालिकेतील शेवटचा सामनाही खेळवला जाईल. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी बंगळुरूला रवाना होईल. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.