गयाना : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये विराटने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन्ही टी-२० मॅचमध्ये विजय झाल्यानंतर आता तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताने तीन बदल केले आहेत. रोहित शर्माला विश्रांती देत केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजाऐवजी लेग स्पिनग दीपक चहर आणि खलील अहमदऐवजी राहुल चहरची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या दोन टी-२० मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तिसरी मॅच जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ विकेटने आणि दुसऱ्या मॅचमध्ये २२ रननी विजय झाला होता.
तिसऱ्या टी-२० मॅच जिंकून भारताला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारताने मागच्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज ३-०ने जिंकली होती. भारताने आतापर्यंत फक्त तीन टीमनाच (वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका) टी-२०मध्ये व्हाईट वॉश केलं आहे. आता एकाच टीमला दोनवेळा व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ५ टी-२० मॅचमध्ये विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ एवढे विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. भारत आणि पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ५ विजय मिळवले आहेत. या मॅचमध्ये विजय मिळवून लागोपाठ ६ विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडिया करू शकते.