Cricket News : या टॉप 10 खेळाडूंना राजकारणाचा फटका, आज असते टीम इंडियाचा हिस्सा

भारतात क्रिकेट धर्म समजला जातो. इथे प्रत्येक मुलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. पण...

Updated: Nov 21, 2021, 10:40 PM IST
Cricket News : या टॉप 10 खेळाडूंना राजकारणाचा फटका, आज असते टीम इंडियाचा हिस्सा title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : भारतीय जर्सी परिधान करणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये असे फार कमी क्रिकेटपटू आहेत जे भारतासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करु शकले आहेत. भारतात क्रिकेट धर्म समजला जातो. इथे प्रत्येक मुलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. पण 
१३५ कोटी भारतीयांमधून फार कमी जण इथपर्यंत मजल मारु शकले आहेत.

जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर लहान लहान शहरातून काही क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट टीमपर्यंत धडक मारली खरी. पण क्रिकेटमधील राजकारणाने त्यांचा मार्ग अर्ध्यावरच संपला. अशाच काही क्रिकेटपटूंची कारकिर्द  अंतर्गत राजकारणामुळे खूप कमी वेळेत संपुष्टात आल्याचं बोललं जातं. आज आम्ही तुम्हाला अशाच १० क्रिकेटपटूंची माहिती देणार आहोत, जे प्रतिभावान असूनही भारतीय संघात फार काळ टीकू शकले नाहीत.

सुब्रमण्यम बद्रीनाथ
भारतासाठी दोन कसोटी सामन्यांमध्ये सुब्रमण्यम बद्रीनाथने एका अर्धशतकासह 63 धावा केल्या आहेत. तसंच बद्रीनाथ भारतीय संघासाठी ७ एकदिवसीय सामनेही खेळला.  सुब्रमण्यम बद्रीनाथ हा एक प्रतिभावान क्रिकेटपटू, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि संयमी फलंदाज होता.  पण चांगली कामगिरी करूनही त्याला संधी मिळू शकली नाही. 

जयंत यादव
जयंत यादवने 4 सामन्यात 45.60 च्या सरासरीने 228 धावा केल्या आणि आपल्या गोलंदाजीने संघासाठी 11 बळीही घेतले. पण आज तो संघाबाहेर आहे. जयंत यादव आजही आपल्या घरी बसून विचार करत असेल की आपलं नेमकं चुकलं कुठे. कारण जयंत यादवला भारतीय संघात संधी मिळाली तेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली होती.

अभिमन्यु मिथुन
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अभिमन्यू मिथुनकडे पाहिलं जात होतं. 120 धावा करण्यासोबतच त्याने 9 विकेट्सही घेतल्या. 2009-10 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात निवड झालेल्या अभिमन्यू मिथुनला संघासाठी केवळ चार कसोटी सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती.

स्टुअर्ट बिन्नी
अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात संधी मिळालेल्या स्टुअर्ट बिन्नीला केवळ सहा कसोटी सामने खेळता आले. यात त्याने १९४ धावा आणि ३ विकेट घेतल्या. 95 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4796 धावा आणि 148 विकेट घेणारा बिन्नी आज घरी बसला आहे

अभिनव मुकुंद
सध्याच्या भारतीय कसोटी संघाकडे पाहता, भविष्यात अभिनव मुकुंद भारतीय संघात पुनरागमन करु शकेल अशी शक्यता फारच कमी आहे. अभिनव मुकुंदही भारतीय संघासाठी केवळ 7 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

जयदेव उनाडकट
स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या उनाडकटला भारतीय संघात फारशी संधी देण्यात आली नाही. जयदेव उनाडकट भारतासाठी केवळ १ कसोटी, ७ एकदिवसीय आणि १० टी२० सामने खेळला आहे.

आर विनय कुमार
विनय कुमारने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ५०४ विकेट घेतल्या आहेत. आर विनय कुमार याच्याकडे दीर्घकाळ खेळणारा क्रिकेटपटू म्हणून पाहिलं जात होतं. पण तो देखील भारतीय संघासाठी फक्त एक कसोटी सामना खेळल्यानंतर पुन्हा कधीही खेळू शकला नाही.

अमित मिश्रा
अमित मिश्राने 2008-09 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. पण 12 वर्षांच्या कारकिर्दीत तो केवळ 22 कसोटी सामने खेळला. यात त्याने तब्बल 75 विकेट घेतल्या. देशातील सर्वोत्कृष्ट लेगस्पिनरपैकी एक असलेला अमित मिश्रा सध्या भारतीय संघापासून फारच दूरावला आहे.

कर्ण शर्मा
आपल्या गुगली गोलंदाजीने कर्ण शर्माने अॅडलेडच्या खेळपट्टीवर ऑसी फलंदाजांना सळो की पो करुन सोडलं होतं. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. पण एका सामन्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. आयपीएलमधून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या या खेळाडूला भारतीय कसोटी संघाची जर्सी मिळाली. पण कर्ण शर्माची कसोटी कारकीर्द अवघ्या एका सामन्यातच थांबली.

वरुण अॅरोन
त्याच्या वेगाने सर्वांनाच चकीत केलं होतं. भारतीय संघासाठी वरुण अॅरोन ९ कसोटी सामने खेळला. ४.७७ इकॉनॉमीर त्याने १८ विकेट्सही घेतल्या. पण यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

पंकज सिंह
देशांतर्गत सामन्यांमध्ये या खेळाडूने केवळ 117 सामन्यांमध्ये तब्बल 472 विकेट घेतल्या. पण आज या खेळाडूचं नावही फारसं कोणाला आठवत नाही.  पंकज सिंग नावाचा हा मध्यमगती गोलंदाज भारतीय संघासाठी 2 कसोटी सामने खेळला आहे.