मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात अगदी कमी वेळातच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेलं एक नाव म्हणजे विराट कोहली. फलंदाजी, कर्णधारपद आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या विराटचा आज वाढदिवस.
सोशल मीडियापासून ते कला आणि क्रीडा वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणी विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत विराट मात्र वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरी धकाधकीपासून दूर एका ठिकाणी पोहोचला आहे.
इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पत्नी अनुष्का सर्मा हिच्यासोबत विराट त्याचा यंदाचा वाढदिवस साजरा करणार आहे. तो आणि अनुष्का शनिवारी रात्रीच देहरादून येथील जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले, जेथून ते नरेंद्र नगर येथे असणाऱ्या हॉटेल आनंद येथे गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ नोव्हेंबरपर्यंत विराट आणि अनुष्का देहरादूनमध्ये असणार आहेत. ज्यानंतर ते रिव्हर राफ्टींग आणि कँपिंगचा आनंद घेणार असल्याचंही कळणार आहे.
विराट आणि अनुष्का येणार असल्यामुळे सध्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि इतर गोष्टींविषटी कमालीची काळजी घेण्यात येत असल्याचं कळत आहे.
विराट आणि अनुष्का यांचं देहरादूनशी खास नातं आहे. ते दोघंही बरेच अध्यात्मिक असून, अनंत बाबा हे त्यांचे गुरु असल्याचं कळत आहे.
कुटुंबातील शुभकार्य म्हणू नका किंवा मग एखादा खास दिवस विराट- अनुष्का आणि त्यांचे कुटुंबीय येथे येऊन नेहमीच आशीर्वाद घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे.