२ ओव्हर टाकल्यानंतर कोसळला, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानात ४-१नं हरवल्यानंतर आता भारतीय टीम टी-२० सीरिजसाठी सज्ज झाली आहे.

Updated: Feb 5, 2019, 05:12 PM IST
२ ओव्हर टाकल्यानंतर कोसळला, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू title=

मुंबई : न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानात ४-१नं हरवल्यानंतर आता भारतीय टीम टी-२० सीरिजसाठी सज्ज झाली आहे. पण ही सीरिज सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडमधला भारतीय मूळ असलेला क्रिकेटपटू हरीश गंगाधरन याचा मृत्यू झाला आहे. हरीश मैदानामध्ये आपल्या क्रिकेट क्लबमधून खेळत होता.

गंगाधरननं मॅचमध्ये फक्त २ ओव्हर बॉलिंग केली होती. यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. थोड्यावेळानंतर हरीश मैदानातच कोसळला. यानंतर लगेचच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, पण याचा फायदा झाला नाही. ३३ वर्षांचा हरीश गंगाधरननं ग्रीन आईसलंडच्या डुनेडिनच्या सनीवेल स्पोर्ट्स सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. हरीशची पत्नी निशा हरीश आणि त्याची ३ वर्षांच्या मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्भाग्यपूर्ण घटनेनंतर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जॉन मोएल म्हणाले 'आमच्या क्लबचा सदस्य हरीश गंगाधरनचा मृत्यू झाला. हरीशला अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. आमच्या प्रयत्नानंतरही त्याला वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही.

हरीश गंगाधरन ग्रीन आईसलंड क्लबकडून खेळताना बॅटिंग आणि ओपनिंग बॉलिंग करायचा. या क्लबची स्थापना १९३० साली करण्यात आली होती. गंगाधरन भारतातल्या कोच्चीचा होता. ५ वर्षांपूर्वी तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला होता.

हरीश गंगाधरन हा शानदार ऑलराऊंडर होता, असं त्याच्या साथिदारांनी सांगितलं. ५० ओव्हर खेळून कमीत कमी २५०चा स्कोअर केला पाहिजे आणि एका खेळाडूनं शतक केलं पाहिजे, असं हरीशनं मॅच सुरु होण्याआधी सांगितल्याचं त्याच्या टीममधला साथीदार सायरस बारनाबस म्हणाला. आम्ही हरीशनं सांगितल्याप्रमाणे ५० ओव्हर खेळलो आणि २५० स्कोअर केला आणि मी शतकही केलं. हरीशनं शेवटपर्यंत मला साथ दिली. तो ३० रनवर नाबाद राहिला, असं भावूक होऊन बारनाबसनं सांगितलं.