मॅच फिक्सिंगप्रकरणी मोहम्मद शमीची चौकशी होणार

मोहम्मद शमीवर करण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर आता बीसीसीआयला जाग आली आहे.

Shreyas deshpande Updated: Mar 14, 2018, 04:32 PM IST
मॅच फिक्सिंगप्रकरणी मोहम्मद शमीची चौकशी होणार title=

मुंबई : मोहम्मद शमीवर करण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर आता बीसीसीआयला जाग आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेल्या बीसीसीआयच्या समितीनं याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले आहेत. नीरज कुमार या सगळ्याची चौकशी करणार आहेत. मोहम्मद शमीनं पाकिस्तानी महिला अलिश्बाकडून पैसे घेतले. इंग्लंडमधला व्यापारी मोहम्मद भाईच्या सांगण्यावरून शमीनं हे पैसे घेतले, असा आरोप शमीची पत्नी हसीन जहांनं केला आहे.

याप्रकरणी शमीच्या बायकोनं सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगची चौकशी होणार आहे. या आरोपानंतर बीसीसीआयनं मोहम्मद शमीच्या कराराचं बीसीसीआयनं नुतनीकरण केलेलं नाही. पुढच्या सात दिवसांमध्ये शमीबद्दलचा रिपोर्ट द्यायला बीसीसीआयनं भ्रष्टाचारविरोधी पथकाला सांगितलं आहे.

मोहम्मद भाई आणि अलिश्बा कोण आहेत? मोहम्मद भाईच्या सांगण्यावरून अलिश्बानं शमीला पैसे दिले का? जर असे पैसे दिले असतील तर ते कोणत्या कारणासाठी देण्यात आले, या तीन प्रश्नांवर शमीची चौकशी होणार आहे. तसंच फक्त या तीन मुद्द्यांवरच चौकशी करण्यात यावी. शमीच्या पत्नीनं केलेल्या इतर आरोपांची चौकशी फक्त क्रिकेटशी संदर्भ येत असेल तरच करावी, असंही बीसीसीआयनं भ्रष्टाचार विरोधी पथकाला सांगितलं आहे. 

कोलकाता पोलिसांनीही बीसीसीआयला याप्रकरणानंतर नोटीस पाठवली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या शेवटच्या टी-20नंतर शमी कुठे गेला, हा प्रश्न या नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी टेस्ट खेळल्यानंतर शमी या सीरिजमधली कोणतीही मॅच खेळला नाही. शेवटच्या टेस्टमध्ये भारतानं मिळवलेल्या विजयात शमीचं महत्त्वाचं योगदान होतं.