प्रतीक्षा संपली, आयपीएलमध्ये लवकरच 2 नवीन संघांचा समावेश, 'या' दिवशी लागणार बोली

आयपीएलमधल्या दोन नवीन संघाच्या लिलावासाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे

Updated: Sep 14, 2021, 05:55 PM IST
प्रतीक्षा संपली, आयपीएलमध्ये लवकरच 2 नवीन संघांचा समावेश, 'या' दिवशी लागणार बोली
संग्रहित फोटो

मुंबई : आयपीएलचा (IPL) पुढचा हंगाम आणखी दणक्यात खेळला जाणार आहे. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये दोन नवीन संघ भारताच्या या मेगा टी 20 लीगमध्ये खेळताना दिसतील. नवीन फ्रँचायझी घेण्यासाठी लिलाव कधी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

लिलावाची तारीख जाहीर

आयपीएल 2022 चा (IPL 2022) हंगाम 8 ऐवजी 10 संघांसह खेळला जाईल. नवीन दोन संघांसाठी बोली 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे याच तारखेपासून म्हणजे 17 ऑक्टोबरपासून युएई (UAE) आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक (T20 World Cup) देखील सुरू होत आहे. त्याचवेळी आयपीएलच्या दोन नविन संघांसाठीची बोली दुबई किंवा मस्कतमध्ये होईल

नविन संघाची इतकी असेल बेसप्राईज

बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नविन टीम घेणारी कंपनी 75 कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. याआधी नवीन संघांची मूळ किंमत 1700 कोटी रुपये ठेवण्यावर विचार केला जात होता, पण आता मूळ किंमत 2000 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या शहरांच्या टीम आहेत रांगेत

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये दोन नविन टीमसाठी अहमदाबाद (Ahmedabad), लखनऊ (Lucknow), इंदौर (Indore), कटक (Cuttack), गुवाहाटी (Guwahati) आणि धर्मशाला (Dharamsala) ही शहरं इच्छूक आहेत.