दुबई : T-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी दोन मोठे सामने होणार असून, हे दोन्ही सामने ग्रुप 2साठी महत्त्वाचे आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात युद्ध रंगणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान-स्कॉटलंड सामना आहे. संपूर्ण भारताच्या नजरा या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यावर लागल्या आहेत. कारण हा सामना अफगाणिस्तानने जिंकला तर टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट मिळू शकतं. दरम्यान नेट-रनरेटवरही बरंच काही अवलंबून असेल.
न्यूझीलंडच्या टीमचे आता 6 गुण आहेत. जर त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केल्यास ते थेट उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. मात्र अफगाणिस्तानने काही अप्रतिम कामगिरी केली तर भारताला संधी मिळू शकते. कारण त्या स्थितीत भारत-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे 6-6 गुण असतील आणि टीम इंडियाचा नेट रन रेट अजूनही सर्वोच्च आहे.
न्यूझीलंड जिंकल्यास उपांत्य फेरीचे दरवाजे भारतासाठी बंद होतील कारण न्यूझीलंडचे आठ गुण होतील आणि शेवटचा सामना जिंकूनही भारताला तितके गुण मिळवता येणार नाहीत. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास त्यांच्या माफक आशा कायम राहतील तर भारताच्या संधी मजबूत असतील, ज्यांना शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. न्यूझीलंड जिंकल्यास भारताचा नामिबियाविरुद्धचा शेवटचा साखळी सामना ही औपचारिकता राहील.
शुक्रवारी नामिबियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. जिमी नीशम आणि ग्लेन फिलिप्स यांनी आघाडीच्या फळीतील अपयशातून सावरताना संघाला चांगली धावसंख्या मिळवून दिली. न्यूझीलंडकडे मजबूत गोलंदाजीचे आक्रमण अफगाणिस्तानच्या फलंदाजांसाठी अडचणीचे ठरेल. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजांना मात्र आता ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने आणि उत्कृष्ट फॉर्मात असलेले फिरकीपटू इश सो़ढी आणि मिचेल सँटनर यांच्याशी सामना करावा लागणार आहे.
अफगाणिस्तानचा फलंदाज चांगल्या धावा करू शकले, तर रशीद खानच्या नेतृत्वाखाली गोलंदाज चमत्कार करू शकतात. मुजीबूर रहमानच्या दुखापतीमुळे गोलंदाजी आक्रमण कमकुवत झाले आहे, परंतु फिरकीविरुद्ध किवी फलंदाजांच्या कमकुवतपणाचा तो फायदा घेऊ शकतो. फलंदाजीत न्यूझीलंडला मार्टिन गुप्टिल आणि डॅरिल मिशेल यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल, त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन नेतृत्वाची धुरा सांभाळेल.