भारतीय संघ वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार- सचिन तेंडुलकर

सचिन एका कंपनीच्या मॅरेथॉनचा एम्बेसडर म्हणून कोलकाता येथे रविवारी उपस्थित होता. 

Updated: Feb 4, 2019, 02:06 PM IST
भारतीय संघ वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार-  सचिन तेंडुलकर title=

मुंबई : आगामी ५० ओव्हरच्या वर्ल्डकप स्पर्धेला काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणता संघ वर्ल्डकप जिंकणार अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु आहे. तसेच प्रत्येक संघात, कोण वर्ल्डकप जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे. भारतीय संघ देखील गेल्या अनेक मालिकांपासून सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहे. असे असताना भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपच्या दृष्टीने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.  

या आगामी वर्ल्डकपसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार आहे, असा विश्वास सचिनने व्यक्त केला. भारतीय संघ कोणत्याही देशात प्रतिकूल परिस्थितीत उत्तमरित्या खेळू शकतो. असे सचिन तेंडुलकर म्हणाला. सचिन एका कंपनीच्या मॅरेथॉनचा एम्बेसडर म्हणून कोलकाता येथे रविवारी उपस्थित होता. त्यावेळी सचिनने हे वक्तव्य केले. भारतीय संघाची गेल्या काही मालिकांमधील कामगिरी पाहता, आपला संघ (भारत) प्रबळ दावेदार आहे असे म्हणण्यात काही गैर नाही. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ५-१, ऑस्ट्रेलियात २-१ तर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धात ४-१ ने विजय मिळवला आहे.

 

 

इंग्लंडची कामगिरी

या वर्ल्डकपचे आयोजन यावेळी इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला. पण इंग्लड संघाची कामगिरी ही आपल्या देशात खेळताना पूर्णपणे वेगळी असते. असा विश्वास सचिनने व्यक्त केला. आगामी वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या काही सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असेल, असे सचिन म्हणाला.

गेमचेंजर न्यूझीलंड

वर्ल्डकपच्या दावेदारी बद्दल बोलताना सचिन म्हणाला की, या वर्ल्डकपचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आल्याने इंग्लंड संघ देखील या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार असेल. 'न्यूझीलंडला या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संघर्ष करावा लागला. पण त्यांचा संघ उत्तम आहे.' तसेच भारतीय संघाने न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिकेत ४-१ ने पराभव केला. पण न्यूझीलंडचा संघ कोणत्याही क्षणी सामन्याची परिस्थिती बदलण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे न्यूझीलंडला कमी न लेखण्याचा सल्ला देखील सचिनने दिला आहे. यामुळे भारताला या वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंडचे देखील आव्हान असणार आहे.