'आम्हाला 'कच्चे-बच्चे' समजू नकोस'; हेडन सेहवागवर संतापला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली.

Updated: Feb 12, 2019, 06:33 PM IST
'आम्हाला 'कच्चे-बच्चे' समजू नकोस'; हेडन सेहवागवर संतापला title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली. या दौऱ्यामध्ये भारतानं टेस्ट सीरिजमध्ये २-१ आणि वनडे सीरिजमध्येही २-१नं विजय मिळवला. टेस्ट सीरिजमधला भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच विजय होता. यानंतर आता ऑस्ट्रेलियाची टीम २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननं भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आहे.

२४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठीचा एक प्रोमो या सीरिजचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सनं बनवला. या प्रोमोमध्ये वीरेंद्र सेहवाग काही लहान मुलांबरोबर दिसत आहे. या मुलांना ऑस्ट्रेलियाची जर्सी घालण्यात आली आहे.

'ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा त्यांनी आपल्याला बेबी सिटींग करणार का असं विचारलं. सगळेच या आम्ही तुम्हाला सांभाळू, असं आम्ही म्हणलं' अस सेहवाग या प्रोमोमध्ये म्हणाला आहे. सेहवागचा हा प्रोमो पाहून मॅथ्यू हेडन चांगलाच भडकला. 'आम्हाला छोटे समजू नकोस, सर्वाधिक वर्ल्ड कप ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहेत.' असं ट्विट हेडननं केलं.

'बेबी सीटिंग'ची सुरुवात

खरं तर या बेबी सीटिंग वादाची सुरुवात ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेननं केली होती. मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पेननं ऋषभ पंतचं स्लेजिंग केलं. 'वनडे टीममध्ये एमएस धोनीचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे तू संघाच्या बाहेर गेला आहेस. तू बेबी सिटरचं काम करु शकतोस. मी पत्नीला चित्रपट दाखवायला घेऊन जाईन तेव्हा तू माझ्या मुलांच्या बेबी सिटरचं काम करशील का?' असा प्रश्न पेननं मैदानातच पंतला विचारला होता.