बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवारी दुसरी टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ वाजता ही मॅच सुरू होईल. पहिली टी-२० मॅच हरल्यामुळे भारताला सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी ही शेवटची टी-२० मॅच जिंकणं बंधनकारक आहे. एवढच नाही तर दुसऱ्या कारणासाठीही या टी-२० मॅचला महत्त्व प्राप्त झालं आहे. एमएस धोनीची ही शेवटची टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते. त्यामुळे क्रिकेट रसिकांची या मॅचवर नजर लागून राहिली आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची टी-२० मॅच आहे. ३० मेपासून १४ जुलैपर्यंत इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाईल. म्हणजेच पुढचे ६ महिने भारत आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळणार नाही. धोनी हा जुलै महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही टी-२० मॅच धोनीची शेवटची ठरू शकते.
धोनीनं वर्ल्ड कपनंतर लगेच निवृत्ती घेतली नाही, तरी त्याची यानंतर टी-२० मॅचमध्ये निवड होईल का याबद्दलही साशंकता आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तसे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्ये धोनीची निवड झालेली नव्हती. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार नाही. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपचा विचार करून धोनीऐवजी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना ऑस्ट्रेलियात संधी दिल्याचं प्रसाद म्हणाले होते.
धोनीनं आत्तापर्यंत ९७ टी-२० मॅचमध्ये ३७.५५ ची सरासरी आणि १२५.२६ च्या स्ट्राईक रेटनं १,५५७ रन केले आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्याच नेतृत्वात भारतानं २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. धोनीला भारताचं कर्णधारपद द्यायची ती पहिलीच वेळ होती.