टी-२० सीरिज गमावली, कर्णधार विराटच्या रेकॉर्डलाही ब्रेक

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली.

Updated: Feb 28, 2019, 05:14 PM IST
टी-२० सीरिज गमावली, कर्णधार विराटच्या रेकॉर्डलाही ब्रेक title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली. दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ७ विकेटनं पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं ही टी-२० सीरिज २-०नं जिंकली. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

विराट कोहलीच्या कर्णधारपदात भारतानं पहिल्यांदाच भारतात एखादी सीरिज गमावली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अपराजित राहण्याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत विराटच्या नावावर होतं. याआधी विराटच्या नेतृत्वात १५ सीरिजपैकी भारतानं १४ सीरिज जिंकल्या. तर एक सीरिज ड्रॉ झाली. विराट कोहलीनं पहिल्यांदा २०१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार झाला होता. 

ग्लेन मॅक्सवेलनं केलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतात पहिल्यांदाच टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलनं ५५ बॉलमध्ये नाबाद ११३ रनची खेळी केली. मॅक्सवेलच्या खेळीमध्ये ९ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता.

त्याआधी या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगची संधी दिली. भारतानं २० ओव्हरमध्ये १९०/४ एवढा स्कोअर केला. शेवटच्या ६ ओव्हरमध्ये भारतानं तब्बल ९१ रन केले. कर्णधार विराट कोहलीनं ३८ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता. धोनीनंही कोहलीला चांगली साथ दिली. धोनीनं २३ बॉलमध्ये ४० रन केले.

या मॅचमध्ये भारतानं रोहित शर्माऐवजी शिखर धवनला संधी दिली होती. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुल आणि शिखर धवन ओपनिंगला आले होते. पण धवन २४ बॉलमध्ये फक्त १४ रन करून माघारी परतला. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या केएल राहुलनं या मॅचमध्ये २६ बॉलमध्ये ४७ रन केले. ऋषभ पंतही १ रन करून आऊट झाला. शेवटच्या ओव्हरला बॅटिंगला आलेला दिनेश कार्तिक ३ बॉलमध्ये ८ रन करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स आणि डीआर्सी शॉर्ट यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

विराटचा एक विश्वविक्रम, तर २ रेकॉर्डची बरोबरी