मुंबई : गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ३ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे क्रिकेटमधली ही आपली शेवटची सीरिज असेल, असं क्रिस गेलने आधीच जाहीर केलं आहे. गेल हा सध्या ३९ वर्षाचा आहे. या वयातही क्रिस गेल कोणत्याही बॉलरसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. २०१९ मध्ये क्रिस गेलने दोन शतकं लगावली आहेत. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये गेलने शतक केलं तर रेकॉर्ड त्याच्या नावावर होईल.
वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त वय असताना शतक करण्याचा विक्रम युएईच्या खुर्रम खानच्या नावावर आहे. खुर्रम खानने ४३ वर्ष १६२ दिवसाचा असताना अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं. पण युएई टेस्ट क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूमध्ये सर्वाधिक वय असताना वनडेमध्ये शतक करण्याचं रेकॉर्ड जयसूर्याच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने ३९ वर्ष २१२ दिवसाचा असताना भारताविरुद्ध शतक केलं होतं.
क्रिस गेलचं वय ३९ वर्ष ३०० दिवस एवढं आङे. त्यामुळे भारताविरुद्ध शतक झळकावलं तर तो जयसूर्याचा विक्रम मोडू शकतो. सर्वाधिक वय असताना वनडेमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये खुर्रम खान पहिल्या, सनथ जयसूर्या दुसऱ्या आणि क्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क्रिस गेलची वनडे क्रिकेटमध्ये २५ शतकं आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि श्रीलंकेच्या कुमार संगकारा यांनीही वनडेमध्ये एवढीच शतकं केली. त्यामुळे गेलकडे आणखी एक शतक करुन एबी आणि संगकाराला मागे टाकण्याची संधी आहे. जर या सीरिजमध्ये गेलने दोन शतकं केली तर तो रोहित शर्मा आणि हाशीम आमलाच्या शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी करु शकतो.