रोहित शर्माच्या निशाण्यावर युवराजसह ३ खेळाडूंची रेकॉर्ड

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं मारून विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. 

Updated: Aug 13, 2019, 06:40 PM IST
रोहित शर्माच्या निशाण्यावर युवराजसह ३ खेळाडूंची रेकॉर्ड title=

मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं मारून विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवार १४ ऑगस्टला तिसरी वनडे खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये रोहितला युवराज सिंग आणि हाशीम आमलाचं रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे ही या सीरिजची शेवटची वनडे असेल. पहिली वनडे पावसाने रद्द झाल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला होता.

वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यात रोहित शर्मा फॉर्ममध्ये दिसत असला, तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. टी-२० सीरिजच्या पहिल्या दोन मॅचमध्ये त्याने २४ आणि ६७ रनची खेळी केली. तर दुसऱ्या वनडेमध्ये रोहित १८ रन करून आऊट झाला. चांगल्या सुरुवातीनंतर रोहितला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे या मॅचमध्ये रोहित मोठी खेळी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

३२ वर्षांच्या रोहित शर्माने २१७ वनडेमध्ये ४८.७४ च्या सरासरीने ८,६७६ रन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित २३व्या क्रमांकावर आहे. जर तिसऱ्या वनडेमध्ये रोहतिने २६ रन केले तर तो युवराज सिंगला (८,७०१ रन) मागे टाकेल. तर शिवनारायण चंद्रपॉलचं रेकॉर्ड मोडायला रोहितला १०३ रनची गरज आहे.

वनडेतल्या शतकांच्या बाबतीत रोहितला दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला मागे टाकण्याची आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची बरोबरी करण्याची संधी आहे. रोहित शर्माची वनडेमध्ये २७ शतकं आहेत. अमलानेही वनडेमध्ये एवढीच शतकं केली आहेत. काहीच दिवसांपूर्वी अमलाने निवृत्तीची घोषणा केली. तर सनथ जयसूर्याने वनडेमध्ये २८ शतकं केली. सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या आणि विराट ४२ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.