चेन्नई: भारतीय संघाने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ही मालिका ३-० अशी जिंकत विंडीजला व्हाईटवॉश दिला.
या सामन्यात शिखर धवन आणि ऋषभ पंतच्या हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. शिखर धवन याने ९२ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी या सामन्यात विंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत सहा षटकांत संघाला अर्धशतकी टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर डॅरेन ब्राव्हो (नाबाद ४३) आणि निकोलस पूरन (नाबाद ५३) या जोडीनं संघाला १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपाने सुरुवातीलाच धक्का बसला. तो अवघ्या चार धावा करुन तंबूत परतला. यानंतर लोकेश राहुलही १७ धावांवर झेलबाद झाला. मात्र, यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतने शिखरला चांगली साथ दिली. ऋषभने ३८ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ५ चौकार आणि ३ षटकार यांचा समावेश होता.