Corona : ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं

ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं 

Updated: Mar 23, 2020, 03:02 PM IST
Corona : ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :  ऑलिम्पिक स्पर्धांचं यंदाचं पर्व हे कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाच्या सावटाखाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक राष्ट्रांना विळखा घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Tokyo olympic 2020 ऑलिम्पिक स्पर्धा २०२० तूर्तास रद्द कराव्यात अशी अनेक स्तरांतून मागणी करण्यात आली होती. पण, ही स्पर्धा रद्द केली जाणारा नसल्याचं २०२० ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदी असणाऱ्या योशिरो मोरी यांनी सोमवारी स्पष्ट केलं. 

एकंदर परिस्थिती पाहता आयोजकांकडून स्पर्धेची तारीख पुढे ढकलण्याबाबतचा विचार केला जाऊ शकतो. पण, स्पर्धा रद्द होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि टोकियोमधील आयोजकांशी आपण चर्चा केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवारी कॅनडाकडून या स्पर्धेतून काढता पाय घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तर, ऑस्ट्रेलियाकडून खेळाडूंना थेट पुढील वर्षासाठी खेळाडूंन तयारी करण्यास सांगितलं आहे. कोरोनाची दहशत पाहता २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान संपन्न होणारी ही अतिभव्य स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघाकडूनही देशाच्या संघाच्या या स्पर्धेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्हं असल्याचं सांगितलं आहे. जवळपास महिन्याभरासाठी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग असेल अथवा नाही हे सांगण्यात येणार आहे. 

पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष

'टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशातील खेळाडूंना पाठवायचं की नाही, याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण साधारण महिनाभर वाट पाहिली पाहिजे. सध्याच्या घडीला आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी चर्चा करत असून परिस्थितीचं बारकाईनं निरिक्षण करत आहोत. सध्याच्या घडीला याबाबत कोणतंही वक्तव्य करणं अनुचित असेल', असं भारतीय ऑलिम्पिक संघाचे सचिव राजीव मेहता आयएएनएसशी संवाद साधताना म्हणाले.