IPL 2019: हार्दिकची पुन्हा फटकेबाजी, दिल्लीला विजयासाठी १६९ रनची गरज

हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे मुंबईने दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये सन्मानजनक स्कोअर गाठला आहे.

Updated: Apr 18, 2019, 09:53 PM IST
IPL 2019: हार्दिकची पुन्हा फटकेबाजी, दिल्लीला विजयासाठी १६९ रनची गरज title=

नवी दिल्ली : हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे मुंबईने दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये सन्मानजनक स्कोअर गाठला आहे. मुंबईने २० ओव्हरमध्ये १६८/५ एवढा स्कोअर केला आहे. कृणाल पांड्याने २६ बॉलमध्ये नाबाद ३७ रनची खेळी केली आहे. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ३२ रन कुटले. यामध्ये २ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. मुंबईने शेवटच्या ३ ओव्हरमध्ये तब्बल ५० रन काढल्या.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने पुन्हा एकदा मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये ६.१ ओव्हरमध्ये ५७ रनची पार्टनरशीप झाली. पण रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर मुंबईला धक्के बसायला सुरुवात झाली. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर अमित मिश्रा आणि अक्सर पटेलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

या मॅचमध्ये मुंबईने टीममध्ये दोन बदल केले आहेत. जेसन बेहरनडॉर्फच्याऐवजी बेन कटिंगला आणि इशान किशनऐवजी जयंत यादवला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इशान किशन आजारी असल्यामुळे तो ही मॅच खेळू शकत नसल्याचं रोहित शर्माने टॉसवेळी सांगितलं. मुंबईच्या टीममध्ये दोन बदल असले तरी दिल्ली मात्र त्याच टीमसोबत मैदानात उतरली आहे.

यंदाच्या मोसमात दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये ऋषभ पंतने वादळी खेळी केली होती. तर मागच्या वर्षी दिल्लीच्याच मैदानात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मुंबईचं मागच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता या दोन्ही पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरली आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानामध्ये हा सामना होत आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा