IPL 2019: वॉर्नरशिवाय हैदराबाद मैदानात, मुंबईला प्ले ऑफ गाठण्याचं आव्हान

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना हैदराबादशी होणार आहे.

Updated: May 2, 2019, 05:20 PM IST
IPL 2019: वॉर्नरशिवाय हैदराबाद मैदानात, मुंबईला प्ले ऑफ गाठण्याचं आव्हान title=

मुंबई : आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना हैदराबादशी होणार आहे. रात्री ८ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरु होईल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वाधिक रन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरशिवाय हैदराबादची टीम मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाला परतला आहे. डेव्हिड वॉर्नरऐवजी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला संधी दिली जाऊ शकते. डेव्हिड वॉर्नरबरोबरच बांगलादेशचा शाकीब अल हसनही मायदेशी परतला आहे.

दुसरीकडे कोलकात्याविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईची टीम मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे. फास्ट बॉलर बरिंदर सरन याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम १४ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम १२ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि हैदराबादच्या टीमनी प्रत्येकी १२-१२ मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर ते प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवतील. १८ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी चेन्नई आणि १६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी दिल्ली याआधीच प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. हैदराबादच्या टीमला मात्र प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.

मुंबई-हैदराबादचं रेकॉर्ड

आयपीएलमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीममध्ये १३ मॅच झाल्या आहेत. यातल्या ७ मॅच हैदराबादने आणि ६ मॅच मुंबईने जिंकल्या आहेत. पण वानखेडेवर झालेल्या मॅचमध्ये मुंबईला ३ आणि हैदराबादला फक्त एकच मॅच जिंकता आली आहे.