IPL 2019: डिकॉक म्हणतो; 'म्हणून मुंबईचा पराभव झाला'

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३४ रननी पराभव झाला.

Updated: Apr 29, 2019, 06:35 PM IST
IPL 2019: डिकॉक म्हणतो; 'म्हणून मुंबईचा पराभव झाला' title=

कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३४ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या बॉलरना विकेट घेता न आल्यामुळे कोलकात्याने २० ओव्हरमध्ये २३२ रन केले. शुभमन गिल आणि क्रिस लिनने कोलकात्याला ९६ रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. तर रसेलने ४० बॉलमध्ये नाबाद ८० रन केले.

कोलकात्याच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. क्विंटन डिकॉक शून्यवर आऊट झाला, तर कर्णधार रोहित शर्माही स्वस्तात आऊट झाला. ५८ रनवर मुंबईचे ४ बॅट्समन आऊट झाले होते. पण हार्दिक पांड्याने एकाकी झुंज सुरुच ठेवली. ३४ बॉलमध्ये ९१ रन करून हार्दिक पांड्या आऊट झाला. यंदाच्या आयपीएलमधलं सगळ्यात जलद अर्धशतक हार्दिक पांड्याने झळकावलं.

मुंबईचा खेळाडू क्विंटन डिकॉकने या मॅचमधल्या पराभवाचं कारण सांगितलं. 'हार्दिक आणि पोलार्ड जेव्हा बॅटिंगला आले तेव्हा मुंबईच्या कमी विकेट गेल्या असत्या तर बरं झालं असतं, पण असं झालं नाही. सुरुवातीपासूनच आम्ही विकेट गमावल्या. हार्दिकला दुसऱ्या बाजूने मदत मिळाली नाही,' असं डिकॉक म्हणाला.

'बॅट्समनसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्ट्यांवर बॉलरकडे खूप कमी संधी असते. ऑस्ट्रेलियाची मैदानं मोठी असतात, तर दक्षिण आफ्रिकेत बॉलरना मदत मिळते. भारतातल्या खेळपट्ट्या बॅट्समनसाठी अनुकूल असतात,' अशी प्रतिक्रिया डिकॉकने दिली.

या मॅचमध्ये क्विंटन डिकॉक शून्यवर आऊट झाला. तर रोहित शर्मा चौथ्या ओव्हरला १२ रन करून माघारी परतला. त्यावेळी मुंबईचा स्कोअर ३.३ ओव्हरमध्ये २१ रन होता. यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये एव्हिन लुईस १५ रनवर आणि नवव्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव २६ रनवर आऊट झाले.

हार्दिक पांड्या एका बाजूने फटकेबाजी करत होता. कायरन पोलार्डने त्याला १४व्या ओव्हरपर्यंत साथ दिली. १८व्या ओव्हरमध्ये स्कोअर १८५ रनपर्यंत पोहचवून पांड्या आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्या २४ रनवर माघारी परतला. मुंबईच्या टीमला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १९८ रन करता आल्या.