अरे यांना आवरा! हॉटेलच्या लॉबीमध्ये हैदराबादच्या खेळाडूंचा कल्ला

हा व्हिडिओ पाहाच... 

Updated: Oct 28, 2020, 05:17 PM IST
अरे यांना आवरा! हॉटेलच्या लॉबीमध्ये हैदराबादच्या खेळाडूंचा कल्ला
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामात 'प्ले ऑफ'मध्ये आपली जागा भक्कम करण्यासाठी आता संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम कामगिरीवर भर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. जिथं चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या दिल्लीला हैदराबादनं मोठ्या फरकानं नमवलं. 

तब्बल 88 धावांनी हा सामना जिंकल्यामुळं आयपीएलमध्ये हैदराबादचं स्थान अजूनही कायम आहे. हैदराबाद आणि दिल्लीच्या संघामध्ये खेळवला गेलेला सामना विशेष चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे डेव्हिड वॉर्नरची तुफानी खेळी. वाढदिवसाच्या दिवशी या बर्थडे बॉयनं 34 चेंडूंमध्ये 66 धावांचा डोंगर रचला. संघातील इतर खेळाडू आणि गोलंदाजांच्या फळीनंही आपलं योगदान देत एकत्रित प्रयत्नांनी हा सामना खिशात टाकला. 

संघाचा हा विजय तितक्याच धमाकेदार अंदाजात साजराही करण्यात आला. कारण आनंद साजरा करण्यासाठी हैदराबादच्या संघाकडे होती दोन मुख्य कारणं. एक म्हणजे संघानं उंचावलेली विजयी पताका आणि दुसरं म्हणजे वॉर्नरचा वाढदिवस. बस, मग काय हॉटेलमध्ये परत येताच ल़ॉबीपासूनच हैदराबादच्या खेळाडूंनी आणि सहकाऱ्यांनी एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. 

 

सोशल मीडियावर या क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आला. ज्यामध्ये व़ॉर्नरच्या चेहऱ्यावर काहीजण केक अक्षरश: फासताना दिसत आहेत. फक्त वॉर्नरच नव्हे तर, ओघाओघानं सर्वांच्याचमध्ये ही केक फाईट रंगल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हे भन्नाट सेलिब्रेशन अनेकांचं लक्ष वेधत आहे.