चेन्नई : गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब असलेल्या एमएस धोनीने पुन्हा एकदा मैदानात पाऊल टाकलं आहे. आयपीएलच्या तयारीसाठी धोनीने सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपरकिंग्सच्या सराव सुरु झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यात आले आहेत.
यंदाच्या आयपीएलला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मोसमाचा पहिलाच सामना गतविजेती मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. या मोसमासाठी धोनीच चेन्नईचं नेतृत्व करेल, हे चेन्नईच्या मालकांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020
२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नाही. यंदाचं आयपीएल हे धोनीसाठी महत्त्वाचं असणार आहे. आयपीएलमधल्या धोनीच्या कामगिरीवरच तो ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळणार का नाही, याविषयी निर्णय होणार आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.