मुंबई : आयपीएलमध्ये उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्याआधी चेन्नईच्या टीमसाठी एक चांगली बातमी आली आहे. चेन्नईचा फलंदाज रुतुराज गायकवाड आता संघात दाखल झाला असून त्याने सराव सुरू केला आहे.
कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे हा 23 वर्षीय महाराष्ट्राचा खेळाडू दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन होता. त्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता. सीएसकेने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे.
सीएसके टीमचे 13 सदस्य मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यात ऋतुराज आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश होता. चहर व इतर 11 जण बरे झाले होते. चहरने दोन वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सराव सुरू केला आणि मुंबई विरुद्ध सामना देखील खेळला.
भारतीय 'अ' संघातील या सदस्याला सीएसकेमध्ये सुरेश रैनाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. या युवा फलंदाजाने युएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नईच्या टीम कॅम्पमध्ये सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रभावित केले होते.
आयपीएलच्या वैद्यकीय निर्देशानुसार जो खेळाडू पॉझिटिव्ह येईल त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. यानंतर दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना संघात घेतलं जाईल.