IPL 2021: आयपीएलमध्ये ऑफ स्पिनर्सचे कमबॅक!

यंदाच्या आयपीएलने ऑफ स्पिनर्सला पुन्हा आत्मविश्वास दिला आहे हे नक्की!

Updated: Apr 23, 2021, 11:07 AM IST
IPL 2021: आयपीएलमध्ये ऑफ स्पिनर्सचे कमबॅक! title=

रवि पत्की झी मीडिया मुंबई: कसोटी सामन्यात ऑफ स्पीन्नर्सनी बॅट्समनना भंडावून सोडलेले असताना टी 20 मध्ये ते बॅट्समनचे गिऱ्हाईक झाले होते. ऑफकडून लेग स्टंपकडे येणारे चेंडू उजव्या बॅट्समनना स्टँडस मध्ये भिरकावणे सोपे झाले होते. अश्विन सारख्या हरहुन्नरी बॉलरला सुद्धा बराच मार पडत होता. एकतर तुम्ही रहस्यमय स्पिनर व्हा किंवा लेग स्पिनर व्हा अशी परिस्थिती आली होती.

रशीद खान,वरुण चक्रवर्ती,सुनील नारायण ह्या मिस्ट्री स्पिनर्सना आणि राहुल चहार,यजुवेंद्र चहाल, मुरुगन अश्विन वगैरे गुगलीवर प्रभुत्व असणाऱ्या लेग स्पिनर्सना मागणी होती. ऑफ स्पिनर्स आयपीएलमध्ये कोपऱ्यात जाऊन पडले होते. परंतु ह्या वर्षी चित्र बदलले आहे. कर्णधारांचा पारंपारिक ऑफ स्पिनर्स वर पुन्हा विश्वास वाढल्या सारखा दिसतोय. धोनी मोईन अलीला विश्वासाने वापरतोय तर अश्विन,वॉशिंग्टन सुंदर हे  पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत आहेत.

अश्विनने चेंडू हातातून सोडण्याचे विविध बिंदू तर सुंदर ने ऍकशन मध्ये बदल करून बॅट्समन स्थिरावणार नाही असे बघितले आहे. अश्विन लेग ब्रेक सुद्धा वापरतोय आणि चेंडूची दिशा सतत बदलतोय. कसोटीत टप्पा आणि दिशा ह्यात सातत्य लागते तर टी20 मध्ये दिशा आणि टप्प्यात जवळपास प्रत्येक चेंडूला बदल करून बॅट्समनला गेस करत ठेवायचे असा एकंदरीत ऑफस्पिनर्सचा नवीन मंत्र दिसतोय.त्यामुळे ते खेळायला आव्हानात्मक झाले आहेत. जलज सक्सेना ह्या ऑफ स्पिनरला अखेर संधी मिळाली.

थोड्या अतिशयोक्तीने सांगायचे तर भारतात रणजी ट्रॉफी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून तो खेळतोय आहे असे वाटावे इतका त्याला प्रथम श्रेणीचा आता अनुभव आहे.त्याचा राजेंदर गोयल किंवा पद्माकर शिवलकर होणार अशी भीती वाटत असताना त्याला अखेर संधी मिळाली. त्याने सुद्धा टिपिकल ऑफस्पिनरची ऍकशन न ठेवता ऍकशन मध्ये छोटे बदल केले आहेत. विविधता असली तर स्पर्धेत टिकणार हा डार्विनचा सिद्धांत टी20 क्रिकेट मध्ये मोठ्या प्रमाणात लागू होतो. त्यामुळे नुसत्या गुगलीनेही भागत नाही तर हातातून ओळखू न येणारे विविध प्रकारचे गुगली भात्यात आणून रशीद खानने धुमाकूळ घातला आहे. त्याचा गुगली ओळखायला रीप्ले सुद्धा चार वेळा बघावा लागतो.

पुन्हा त्याचे सगळे गुगली लेग स्पिन सारखेच वाटतात.अजून तरी त्याची बॉलिंग ऑफ द हँड ओळखणारा कोणताही बॅट्समन चटकन डोळ्यासमोर येत नाही. सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचे कोडे बऱ्यापैकी बॅट्समननी सोडवले आहे असे वाटते.

पण ह्या आयपीएलने ऑफ स्पिनर्सला पुन्हा आत्मविश्वास दिला आहे हे नक्की. नाहीतर एक कला टी20 तून हद्दपार व्हायच्या मार्गावर होती. ह्याचे श्रेय स्पर्धेत टिकण्यासाठी ऑफसपीनर्सनी अथक परिश्रमातून आणलेल्या नाविण्यास जाते.

Tags: