IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं आणि सर्वात लांब सिक्सचा उल्लेख झाला नाही तर ते अपूर्णच आहे. 2022 च्या आयपीएल मोसमात 23 सामने झाले असून एकूण 350 सिक्स लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी एकूण 17 षटकार ठोकले होते. यातील शिवम दुबेच्या बॅटने 9 सिक्स आले होते. मात्र, त्यालाही या सीजनमधला सर्वात लांब सिक्स मारता आलेला नाही. महेंद्रसिंह धोनी किंवा रोहित शर्मा या दोघांनाही ही कामगिरी करता आली नाही. पण एका 18 वर्षीय फलंदाजाने मोसमातील सर्वात लांब सिक्स ठोकला आहे.
18 वर्षीय डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald brevis), मुंबई इंडियन्सकडून पहिला आयपीएल सीजन खेळत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने या मोसमातील सर्वात लांब सिक्स ठोकला आहे. त्याने 112 मीटर लांब सिक्स मारला आहे. या सामन्यात ब्रेव्हिसने पंजाबचा लेगस्पिनर राहुल चहरच्या एका ओव्हरमध्ये सलग 4 बॉलमध्य 4 सिक्स ठोकले होते.
पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने या मोसमात डेवाल्ड ब्रेव्हिसनंतर दुसरा सर्वात लांब सिक्स मारला आहे. त्याने 108 मीटर लांब सिक्स ठोकला होता. सीझनमधील तिसरा सर्वात लांब सिक्सही लिव्हिंगस्टोनच्या बॅटमधून आला आहे. जो 105 मीटरचा होता.
चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराऊंडर शिवम दुबे याचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 102 मीटर लांब सिक्स ठोकला आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाज ब्रेव्हिसनेही 102 मीटर लांब सिक्स ठोकला आहे.
IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने सर्वाधिक षटकार (Six) ठोकले आहेत. त्याने 4 सामन्यात 15 सिक्स मारले आहेत. राजस्थानचा फलंदाज शिमरॉन हेटमायरही दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 14 सिक्स मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या बॅटमधून 13 सिक्स लागले आहेत.