मुंबई : गेल्या वर्षी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सामने स्थगित करावे लागले. तर दुसऱ्या सत्रात भारताबाहेर सामने खेळवण्याची वेळ आली होती. यंदाच्या आयपीएलचा पूर्ण फॉरमॅट वेगळा असणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी पहिला सामना पंजाब विरुद्ध कोलकाता होणार आहे.
दोन शहरं, 10 संघ आणि 70 सामने होणार आहेत. या सामन्यांपूर्वी खेळाडूंना कडक बायोबबलमध्ये राहावं लागणार आहे. याशिवाय सर्व काळजी घेऊनही खेळाडू जर कोरोना पॉझिटिव्ह आलाच तर IPL चा सामना रद्द होणार की पुढे ढकलला जाणार याबाबत महत्त्वाची माहिती BCCI ने दिली आहे.
यंदा 10 संघांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. दोन गट त्यासाठी तयार करण्यात आले असून त्यांच्यात आयपीएलचे सामने होणार आहेत. सामन्यावेळी किंवा पूर्वी जर एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला तर 9 खेळाडूंसह सामना खेळवण्यात येईल. अशावेळी सामना रद्द केला जाणार नाही अथवा पुढे ढकलला जाणार नाही अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
बीसीसीआयने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र 9 खेळाडूंसह सामना खेळवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यंदा खेळाडूंना बायो बबल आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कठोर नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे आता टीम आणि फ्रान्चायझीसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.
यंदाचं आयपीएल अनेक अर्थानं वेगळं असणार आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून टाटा आहे. तर 10 संघ मैदानात उतरणार आहेत. यावेळी टीममध्येही मोठे बदल झाले आहेत. काही टीमने कर्णधार देखील बदलले आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.