IPL 2023 Final: ...अन् धोनीने त्याला मैदानातच उचलून घेतलं; Video झाला Viral! विराटची Insta स्टोरीही चर्चेत

IPL 2023 Final Virat Kohli Message: अगदी शेवटच्या चेंडूवर आयपीएलचा चषक चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने जिंकला तो रविंद्र जडेजाने लगावलेल्या चौकारामुळे. या विजयानंतर चेन्नईच्या संघातील सहकाऱ्यांनी तुफान सेलिब्रेशन केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 30, 2023, 08:16 AM IST
IPL 2023 Final: ...अन् धोनीने त्याला मैदानातच उचलून घेतलं; Video झाला Viral! विराटची Insta स्टोरीही चर्चेत title=
IPL 2023 Final Virat Kohli Message

CSK Win IPL Final 2023: 74 सामने, हजारो रन, हजारो ओव्हर्सनंतरही यंदाच्या इंडियन प्रमिअर लिगचा (IPL 2023 Final) निकाल अगदी शेवटच्या चेंडूवर लागला. चेन्नई सुपर किंग्जला पावसामुळे दिलेलं रिव्हाइज लक्ष्य त्यांनी रविंद्र जडेजाच्या मदतीने अगदी शेवटच्या चेंडूवर गाठलं. पावसाच्या व्यत्ययानंतरही अतिशय रंजक सामन्यामध्ये चेन्नईने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (CSK vs GT) संघावर निसटता विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं. या विजयामध्ये धावांच्या माध्यमातून कर्णधार महेंद्रसिंह धोनीला योगदान देता आलं नाही. पहिल्या चेंडूवरच धोनी एकही धाव न करता बाद झाला. मात्र जडेजाने खेचून आणलेला विजय पाहून कायमच संयमी भूमिका घेणाऱ्या धोनीलाही आपल्या आनंदाला आवर घालता आला नाही. धोनीने रविंद्र जडेजाला चक्क उचलून घेतलं. विशेष म्हणजे या विजयानंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या विराट कोहलीनेही जडेजाचं तसेच धोनीचं कौतुक केलं आहे.

रंजक शेवट अन् सेलिब्रेशन

शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता असताना मोहित शर्माच्या भन्नाट गोलंदाजीला जडेजा कसं उत्तर देणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र जडेजाने षटकातील पाचव्या चेंडूवर फ्लॅट सिक्स मारला. त्यामुळे विजयाचं गणित एका चेंडूत 4 धावा असं झालं. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने मनगटाचा वापर करुन लेग साईडला मारलेला फटका स्लिपमधून चौकार गेला आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. चेन्नईच्या विजयानंतर धोनीनने लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. डोळे मिटून स्वस्थपणे बसलेल्या धोनीची मुद्रा कॅमेरात कैद झाली. दुसरीकडे विजयी चौकार खेचणारा जडेजा बॅट उंचावून मैदानात सेलिब्रेशन करत होता. दरम्यान सीएसकेच्या अन्य खेळाडूंनी मैदानात धाव घेत सेलिब्रेशन सुरु केलं. मैदानामध्ये धावता धावता जडेजा जेव्हा सीएसकेच्या डगआऊटजवळ पोहोचला तेव्हा धोनीने त्याला मिठी मारली. इतकेच नाही तर धोनीने हेल्मेट, पॅड आणि हातात ग्लोज घालून बॅट उंचावणाऱ्या जडेजाला थेट उचलून घेतलं. हा क्षण कॅमेरात कैद झाला.

विराटची इन्स्ता स्टोरी

दुसरीकडे इंग्लंडमध्ये या सामन्याचा आनंद घेणाऱ्या विराट कोहलीने सामना संपल्यानंतरचं सेलिब्रेशन टीव्हीवर पाहत असताना टीव्ही स्क्रीनचा फोटो शेअर करत जडेजा आणि धोनीचं कौतुक केलं आहे. वाह.. काय चॅम्पियन्स आहेत. जडेजा अगदी स्टार आहे. सीएसकेने छान खेळ केला. धोनीचा विशेष उल्लेख करावा लागेल, अशा अर्थाच्या मजकुरासहीत विराटने इन्स्ताग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. 

मुंबईशी बरोबरी

यंदाचं आयपीएल जिंकल्याने सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक जिंकलेल्या संघाच्या यादीमध्ये चेन्नईने मुंबईसहीत संयुक्तरित्या पहिलं स्थान मिळवलं आहे. मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी पाच वेळा हा चषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.