IPL 2024: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिल्याने अनेक क्रिकेटचाहते नाराज झाले असून, अद्यापही ती मिटलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला कर्णधार करणं अजिबात आवडलेलं नाही. त्यात पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने रोहित शर्माला भडकत आदेश दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, चाहत्यांच्या संतापात भर पडली आहे. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यावरुन सुरु असलेल्या वादावर माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही भाष्य केलं आहे. स्टार स्पोर्टशी संवाद साधताना त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत यावर भाष्य केलं.
"मी अशा भारतीय संघात खेळलो आहे, जिथे एकाच वेळी पाच कर्णधार खेळत होते. कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर, कृष्णामाचारी श्रीकांत आणि रवी शास्त्री. एक वीट उचला आणि तुम्हाला त्याच्या वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी कर्णधार मिळेल. पण यात काही अडचण नाही. कारण तुम्ही देशासाठी खेळत होता. त्यावेळी आपल्या देशासाठी खेळण्याची प्रेरणा होती. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वात खेळल्यास रोहित छोटा होत नाही," असं नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले आहेत.
माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुढे सांगितलं की, "मी तुम्हाला गॅरंटी देतो की यामुळे रोहित शर्मा छोटा खेळाडू होत नाही. तो मोठा खेळाडू आहे. ही एक फ्रँचाइजी आहे ज्यांनी नव्या व्यक्तीला आणून समोर उभं केलं आहे. तो चांगला असून सर्वांनी त्याला स्विकारलं आहे. पण रोहित एक महान खेळाडू आहे". यावेळी नवज्योत सिंग सिद्ध यांनी आपल्या शैलीत शायरीमध्ये म्हटलं की, 'लहान व्यक्ती पर्वताच्या शिखरावर उभी राहिली तरी, देव हा देवच असतो, जरी तो विहीरीच्या खोलीत उभा असेल'. (बौना फिर बौना है चाहे वह पर्वत के शिखर पर खड़ा हो, देवता फिर देवता है चाहे वह कुएं की गहराई में खड़ा हो)
लोखंड तापल्यानंतर त्याचं रुपांतर धारदार तलवारीत होतं असंही सिद्धू यावेळी म्हणाले. लाखो वादळं झेलल्यानंतर रोहित आणि धोनीसारखं नेतृत्व तयार होतं असं कौतुकही त्यांनी केलं. सूर्य कधीच आपलं प्रमाण देत नाही. त्याचं तेज हेच त्याचं प्रमाण आहे असंही त्यांनी म्हटलं.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहित तब्बल 10 वर्षांनी मुंबई इंडियन्स संघात फक्त खेळाडू म्हणून खेळत आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 27 मार्चला सनरायजर्स हैदराबादविरोधात होणार आहे.