IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2024, 10:54 AM IST
IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार title=
आज दोन्ही संघांमध्ये रंगणार एलिमिनेटर सामना

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्सच्या संघांदरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ आज देशातील सर्वात मोठं क्रिकेट ग्राऊण्ड असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांसमोर येणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या सामन्यासंदर्भात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 च्या सामन्यात प्रवेश करेल. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना खेळावा लागणार आहे. तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर पडणार आहे. मात्र आयपीएलमधील एक नियम असा आहे की ज्यामुळे पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असलेल्या आरसीबीचा संघ मैदानात न उतरताच स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो.

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक सामन्यांमध्ये आली ही अडचण

आयपीएल 2024 च्या साखळी सामन्यांपैकी शेवटच्या काही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अनेक सामने रद्द करुन दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून देण्यात आला. मात्र आजच्या एलिमिनेटरच्या सामन्यादरम्यानही पाऊस झाल्यास त्याचा फटका आरसीबीला बसेल. आयपीएलच्या टाइमटेबलमध्ये क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळेच आरसीबी आणि राजस्थानच्या सामन्याच्या सायंकाळी म्हणजेच आज सायंकाळी अहमदाबामध्ये पाऊस पडला तर कमी षटकांचा सामना खेळवावा लागेल. मात्र कमीत कमी प्रत्येकी 5 षटकांचा सामना खेळवता आला किंवा सुपर ओव्हरच्या माध्यमातून मैदानातील कामगिरीनुसार निकाल लागेल. पण सतत पाऊस कोसळत राहिला आणि एकूण 10 ओव्हरचाही सामना झाला नाही अथवा अगदी सुपर ओव्हरही खेळवता आली नाही तर पॉइण्ट्स टेबलमधील स्थानानुसार विजेता घोषित केला जाईल.

..तर राजस्थान जाणार क्वालिफायर-2 मध्ये

साखळी फेरीमध्ये राजस्थानचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे तर आरसीबीचा संघ चौथ्या स्थानी आहे. म्हणूनच पावसामुळे एक चेंडूही खेळवण्यात आला नाही तर राजस्थानला विजेता घोषित करुन क्वालिफायर-2 साठी पात्र ठरवलं जाईल. मात्र यामुळे आरसीबीच्या चाहत्यांचा हिरमोड होईल कारण एकही चेंडू न खेळता त्यांचा आवडता संघ स्पर्धेबाहेर पडेल. 18 मे रोजी झालेल्या साखळी फेरीतील आरबीसी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यामध्ये आरसीबीच्या संघाने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आरसीबीला हा सामना किमान 18 धावांनी जिंकणं आवश्यक होतं. अत्यंत रोमहर्षक सामन्यात आरसीबीने चेन्नईऐवजी स्वत: प्लेऑफसाठी पात्र ठरत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र या उत्साहावर आज पाऊस पाणी फेरु शकतो.

आज अहमदाबादचं हवामान कसं असेल?

मात्र आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नसून अहमदाबादमधील हवामान स्वच्छ राहील असं सांगण्यात आलं आहे. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागारमाध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा फटका ओडिशाला बसणार असला तरी गुजरातवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.  

असे आहेत दोन्ही संघ

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जॉस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोवमॅन पावेल, टॉम कोहलर-केडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायसवाल, युजवेंद्र चहल आणि तनुश कोटिय 

रॉयल चैलेंजर्स बेंगळुरु: फॅफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान