'अस्वीकार्य, लाजिरवाणं', KKR विरोधातील दारुण पराभवानंतर DC चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संतापला, 'इतकं वाईट...'

IPL 2024: कोलकाताने 106 धावांनी दारुण पराभव केल्यानंतर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघातील खेळाडूंवर संतापला आहे. त्याने हा पराभव अस्वीकार्य आणि लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2024, 11:41 AM IST
'अस्वीकार्य, लाजिरवाणं', KKR विरोधातील दारुण पराभवानंतर DC चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संतापला, 'इतकं वाईट...' title=

IPL 2024: कोलकाताने बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीचा 106 धावांनी दारुण पराभव केला. दिल्लीच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने संताप व्यक्त केला आहे. सामन्यातील पहिल्या अर्ध्या डावात संघ ज्याप्रकारे खेळला आणि धीम्या गतीने गोलंदाजी करताना दिलेल्या धावा हे फार लाजिरवाणं असल्याचं रिकी पाँटिंग म्हणाला आहे. विशाखापट्ट्णम येथे झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने गोलंदाजी, फलंदाजी अशा सर्वच क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली. 

आयपीएलच्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. कोलकाताने सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली होती. सुनील नरेन याने 39 बॉलमध्ये 7 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 85 धावांची खेळी केली. तर अंगक्रिश रघुवंशी याने 19 बॉलमध्ये 41, रिंकू सिंगने 8 बॉलमध्ये 26 धावा करत कोलकाताला 272 धावसंख्या उभारण्यात मदत केली. कोलकाताने दिलेलं 273 धावांचं आव्हान पार करताना दिल्लीचा संघ ढेपाळला आणि 106 धावांनी कोलकाता जिंकली. 

या सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रिकी पाँटिंग म्हणाला की, "सामन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात आम्ही फारच लाजिरवाणा खेळ केला. आम्ही फार धावा दिल्या. आम्हाला गोलंदाजी करण्यास 2 तास लागले. म्हणजे आम्ही 2 ओव्हर मागेच घेतो. म्हणजे शेवटच्या दोन ओव्हर्स टाकणाऱ्या गोलंदाजांसाठी फक्त 4 खेळाडू सर्कलबाहेर होते".

"या सामन्यात अशा अनेक गोष्टी झाल्या ज्या स्विकारल्या जाऊ शकत नाहीत. आम्हाला स्पर्धेत पुढे जाताना या सर्व बाबींवर काम करावं लागणार आहे," असंही रिकी पाँटिंगने म्हटलं. 

रिकी पाँटिंगने यावेळी कोलकाता संघाचं कौतुकही केलं. "त्यांनी पॉवरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात मिळाली. 6 ओव्हर्समध्ये त्यांनी 90 धावा केल्या होत्या. हा आदर्श टप्पा नाही. जर सामन्याच्या सुरुवातीलाच असं होत असेल तर तुम्हाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी मार्ग शोधावा लागतो. पण त्यांनी आज आम्हाला ती संधीच दिली नाही. ते निर्दयीपणे खेळत होते. पण आम्हाला स्वत:कडे टीकात्मक नजरेने पाहावं लागणार आहे".

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सामन्यात अर्धशतक ठोकलं. मात्र ऋषभ फलंदाजी करत असताना फिजिओ मैदानात आला होता. दरम्यान रिकी पाँटिंगने तो फक्त दमला असावा असं म्हटलं आहे. "त्याने फिजिओला बोलावल्याचं मी पाहिलं. कदाचित त्याला थकवा जाणवत असावा. तो फलंदाजी करताना चांगली हालचाल करत होता. फिजिओला बोलावल्यानंतर तो स्ट्रेचिंग करत होता. त्याला फक्त क्रॅम्प आला होता," असं रिकी पाँटिंगने सांगितलं. 

तसंच त्याने पंतच्या फलंदाजीचं कौतुक केलं. "पंतने केलेली फलंदाजी पाहून बरं वाटलं. अशा स्थितीत त्याने मैदानात गेल्यानंतर सुरुवातीपासून फटके लगावणं अपेक्षित असतं. या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याने दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली," असं रिकी पाँटिंग म्हणाला.