IPL 2024 Winner Brett Lee Prediction: इंडियन प्रिमिअर लीगचं म्हणजेच आयपीएलचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होत आहे. 10 संघ यंदा आयपीएलच्या ट्रॉफीसाठी एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नईमधील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना विद्यमान विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि एकदाही जेतेपदावर नव न करता आलेल्या पण विक्रमांची टांगसाळ घालणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईच्या संघामध्ये नेतृत्व बदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यमान विजेत्या संघाविरोधात विजयाने सुरुवात करण्याचा बंगळुरुचा मानस असेल.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये आरसीबीच्या संघाला प्लेऑफमध्येही पात्र होता आलं नव्हतं. पॉइण्ट्स टेबलमध्ये आरसीबीचा संघ 14 पॉइण्ट्सहीत सहाव्या स्थानी राहिला होता. संघाला केवळ 50 टक्के म्हणजेच 14 पैकी 7 सामनेच जिंकता आले होते. अपयशाचा हाच ठपका पुसून काढण्यासाठी यंदा आरसीबी विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल. असं असतानाच माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही बंगळुरुच्या संघासंदर्भात मोठा दावा केला आहे. ब्रेट लीने यंदा आरसीबी केवळ दमदार कामगिरी करेल असं नाही तर थेट विजयी चषक उचलेलं असं भाकित व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हा दावा ब्रेट लीकडून करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> धोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक
एका कार्यक्रमामध्ये कोणत्या संघाला यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे असं विचारण्यात आलं असता ब्रेट लीने सविस्तरपणे उत्तर दिलं. मागील अनेक वर्षांपासून आरसीबीचा संघ हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघ असल्याचं ब्रेट लीने म्हटलं आहे. यंदा संघाचं बदलेलं नाव आणि बदलेली जर्सी त्यांच्यासाठी लकी ठरेल असंही ब्रेट ली म्हणाला.
नक्की वाचा >> 'मैदानात हार्दिक वारंवार रोहितकडे पळत येईल आणि..'; 'मुंबई'बद्दल सिद्धूची भविष्यवाणी
"मी सर्व संघांमधील खेळाडूंची नामावली वाचली. मी 10 ही संघांची यादी वाचून काढली. सध्या तो (ए. बी. डिव्हिलीअर्स) माझ्या बाजूला बसला असल्याने मी हे बोलत नाहीये पण खरंच मला वाटतं की यंदा आरसीबीला स्पर्धा जिंकण्याची उत्तम संधी आहे. मी त्यांच्याविरोधात पैंज लावणार नाही. मागील अनेक वर्षांपासून हा एक सर्वोत्तम संघ ठरला आहे. अर्थात हा सर्वोत्तमपणा वेगवेगळ्या बाबींमध्ये असू शकतो. इथे भारतामध्ये बऱ्याच गोष्टी काहीही कारण नसताना मानल्या जातात. त्याप्रमाणे विचार केला तर आता त्यांनी संघाचं नावही बदललं आहे. त्यांच्या जर्सीचा रंगही बदलला आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष त्यांचं असू शकतं," असं ब्रेट ली म्हणाला.
नक्की वाचा >> 'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया
आरसीबीच्या संघाने नुकतेच आपल्या संघाचे नाव 'रॉयल चॅलेंजर्स बंगळोर'वरुन बदलून 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' असं केलं. ही घोषणा 19 मार्च रोजी झालेल्या आरसीबीच्या 'अनबॉक्स इव्हेंट'मध्ये करण्यात आली. याचवेळी संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं असून आता आरसीबीचा संघ केवळ लाल रंगाच्या जर्सीत दिसणार नसून जर्सीवर निळा रंगही झळकला आहे.