मुंबई : आयपीएल लिलावात युवा खेळाडूंनी सर्व टीम्सवर जोरदार बोली लावली, यात बिहारचा युवा क्रिकेटर ईशान किशनला मुंबई इंडियन्सने ६.२ कोटी रूपयात खरेदी केलं.
बिहार आणि झारखंडचे लोक ईशान किशनमध्ये महेंद्र सिंह धोनीची प्रतिमा पाहतात. ईशान देखील धोनीसारखाच विकेटकीपर बॅटसमन आहे. ईशानचे वाईट दिवस सुरू झाले होते, पण महेंद्र सिंह धोनीने त्याला पुन्हा क्रिकेटचे काही धडे शिकवले, यानंतर ईशानचं प्रदर्शन खूप सुधारलं.
ईशान किशन आणि महेंद्र सिंह धोनी झारखंडकडून खेळतात. ईशान आणि धोनीची क्रिकेट शिकण्याची कहाणी देखील एक समान आहे. धोनीच्या आईवडिलांप्रमाणे ईशानच्या आईवडिलांनाही वाटत होतं की, ईशानने अभ्यासावर लक्ष द्यावं.
मात्र ईशान किशन अंडर १९ क्रिकेटसाठी निवडला गेला होता. तेव्हा एका मुलाखतीत ईशानची आई म्हणाली होती, लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यावर क्रिकेटचं भूत होतं, हे दूर करण्यासाठी त्याची आई हनुमान चालीसाचं पठण करत होती. ईशानचं क्रिकेट प्रेम मात्र कमी झालं नाही, परिस्थिती अशी झाली की रात्री झोपतानाही तो बॅटसोबत घेऊन झोपत होता.
ईशानचे वडील प्रणव पांडेय म्हणतात की, त्यांनी ईशानचं अॅडमिशन पाटणाच्या डीपीएसमध्ये केलं, तो नापास झाल्याने शाळेने त्याला काढून टाकलं. ईशानच्या बाबा रागावले, तेव्हा तो स्पष्ट म्हणाला, मला शिकण्यात रस नाही एवढा, क्रिकेटमध्ये आहे. यानंतर त्याच्या बाबानी त्याला क्रिकेट खेळण्याची सूट दिली.