लंडन : इंग्लंड विरुद्ध आयर्रलंड यांच्यातल्या एकमेव टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही टेस्ट लॉर्ड्समध्ये खेळली जाणार आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननला आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची संधी आहे.
अंडरसन सध्या आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विराजमान आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या खगिसो रबाडाने अंडरसनकडून त्याचा पहिल्या क्रमांक हिरावनू घेतला होता. यानंतरच पॅट कमिन्सने क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर उडी घेतली होती.
सध्या पॅट कमिन्स आणि अंडरसन हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांमध्ये १६ पॉइंट्सचे अंतर आहे. पॅट कमिन्सचे ८७८ पॉइंट्स आहेत. तर जेम्स अंडरसन ८६२ पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑगस्ट १ पासून ऍशेस सीरिजला सुरुवात होत आहे. त्यामुळे पॅट कमिन्स आणि जेम्स एंडरसन यांच्यात अव्वल क्रमांकावर पोहचण्याची आणि कायम राहण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. अंडरसनला ऍशेसआधीच रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची आशा आहे.
अंडरसनचं लॉर्ड्सचं मैदान हे पसंतीचं आहे. या ऐतिहासिक मैदानावर अंडरसनने १०० पेक्षा अधिक विकेट मिळवल्या आहेत. त्यामुळे अंडरसन क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची अधिक शक्यता आहे.