नवी दिल्ली : आयपीएल २०१८ साठी खेळाडूंचा लिलाव आता जवळ येत आहे. अशात अनेक खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यात काश्मीरच्या एका खेळाडूची चांगलीच चर्चा रंगली आहे. जर त्याला नशीबाने साथ दिली तर हा खेळाडू आयपीएलमध्ये दिसू शकतो.
काश्मीरच्या या खेळाडूचं नाव आहे मंजूर अहमद डार. मंजूर हा केवळ क्रिकेटर नाहीये तर तो एक वेटलिफ्टर, एक कबड्डी खेळाडू आणि सिक्युरिटी गार्डही आहे. मंजूरला काश्मीर क्रिकेटच्या विश्वात १०० मीटर सिक्सरमॅन म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही दिवसांपासून त्याचे गगनचुंबी सिक्सर चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
जम्मू काश्मीर क्रिकेट टीमचे कोच अब्दुल कयूम सांगतात की, ‘मंजूर ‘मिस्टर १०० मीटर सिक्सरमॅन आहे’. तो बॉलला योग्य प्रकारे आकाश दाखवतो. गेल्या वर्षी पंजाबसोबत झालेल्या एका सामन्या त्याने काही सिक्सर लगावले होते. हे सिक्सर १०० मीटरपेक्षा दूर गेले होते’. कयूम हे कपिल देव यांच्या समकालिन खेळाडू आहे आणि स्वत: एक वेगवान गोलंदाज होते. ते राज्य स्तरावर सर्वाधिक विकेट घेणा-यांपैकी एक आहेत. ते मंजूरबाबत सांगतात की, ‘या मुलात चांगलीच प्रतिभा आहे. जर तो १२ ते १५ बॉल्स खेळला तर सामना आपल्या टीमच्या पक्षात ओढून आणतो’.
सहा फुट दोन इंच उंच असलेल्या मंजूरचं वजन ८४ किलो आहे. त्याला लोक ‘पांडव’ या नावानेही हाक मारतात. म्हणजेच तो पाच पांडवांसारखा मजबूत आहे. त्यामुळे त्याचं नाव पांडव पडलं आहे.
कमी बोलणारा हा खेळाडू मध्यम गतीने गोलंदाजीही करतो. मंजूर एका गरीब परीवारातून येतो. तो बांदीपोरा जिल्ह्यातील सोनावारी गावातील आहे. त्याचे वडील मजूरी करतात. दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. मंजूरवरच त्याच्या परिवाराची जबाबदारी आहे. तरीही तो निराश नाहीये. त्याला आयपीएलमध्ये संधी मिळण्याची वाट आहे.