निधी अग्रवालसोबतच्या नात्यावर बोलला के एल राहुल

भारताचा क्रिकेटपटू के एल राहुल काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये दिसला होता.

Updated: Jun 2, 2018, 09:34 PM IST
निधी अग्रवालसोबतच्या नात्यावर बोलला के एल राहुल

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू के एल राहुल काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये दिसला होता. या दोघांच्या डिनर डेटचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आणि दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या चर्चांना के एल राहुलनं पूर्णविराम दिला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला राहुलनं मुलाखत दिली. मी आणि निधी फक्त मित्र आहोत. बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. मी जर कोणाबरोबर डेट करत असेन तर त्याबद्दल सांगेन. अशा गोष्टी लपवून करणार नाही, असं राहुल म्हणाला. मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असू शकत नाही का? असा सवालही राहुलनं विचारला. आम्ही दोघंही एकाच शहरातून येतो. मी क्रिकेटपटू आणि ती अभिनेत्री नव्हती तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, अशी प्रतिक्रिया राहुलनं दिली.

हॉटेलमध्ये फक्त आम्ही दोघंच गेलो नव्हतो. बंगळुरूचे तीन ते चार मित्र आमच्याबरोबर होते, असं स्पष्टीकरण राहुलनं दिलं आहे. आयपीएलच्या या मोसमात राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पंजाबकडून खेळताना राहुलनं १४ मॅचमध्ये ५४.९१ ची सरासरी आणि १५८.४१ च्या स्ट्राईक रेटनं ६५९ रन केल्या. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल तिसऱ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर केन विलियमसन आणि दुसऱ्या क्रमांकावर रिषभ पंत होता.