मुंबई : आयपीएल मॅचवेळी बेटिंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बुकी सोनू जलानला अटक केली आहे. चौकशीवेळी सोनूनं अभिनेता अरबाज खानचं नाव घेतलं. यामुळे पोलिसांनी अरबाज खानला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीवेळी अरबाज खाननं आपण बेटिंग केल्याची कबुली दिली. सट्टेबाजीमुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्यावरची उधारी वाढत गेली. सट्टा जिंकून मला जुनी उधारी चुकती करायची होती. पण सट्ट्यामध्ये मला अपयश येत होतं, असं अरबाज खान चौकशीत म्हणाला. अरबाज आणि मलायका अरोराच्या घटस्फोटालाही अरबाजची ही सवय जबाबदार असल्याची माहिती आता समोर येत आहे.
ठाणे पोलिसांनी अरबाज खानची चौकशी केली तेव्हा आपल्याला सट्टेबाजीमध्ये तीन कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. तसंच मागच्या वर्षी २.७५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं अरबाजनं सांगितलं. मागच्या ६ वर्षांपासून मी सट्टा लावत असल्याची कबुली अरबाज खाननं दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०१८च्या संपूर्ण मोसमात बुकी सोनू जलाननं ५०० कोटी रुपयांची कमाई केली. फायनल मॅचमध्ये त्यानं १० कोटी रुपये कमावले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानमध्ये कारभार सांभाळणाऱ्या एहतेशाम आणि डॉक्टर यांच्या संपर्कात सोनू जलान होता. भारत, पाकिस्तान, दुबई आणि अखाती देशांमध्ये सट्टाबाजाराचं कलेक्शन डॉक्टर आणि एहतेशाम यांच्याकडे होतं. हे दोघं अनीस इब्राहिम आणि शकीलला या सगळ्याची माहिती द्यायचे. याचबरोबर सोनू दुबईमध्ये दाऊदच्या एकदम जवळचा समजला जाणारा रईस सिद्दीकी आणि अनिल कोठारी उर्फ अनिल टुंडाच्या संपर्कातही होता. रईस आणि अनिल दोघं डी कंपनीसाठी दुबईत सट्टा बाजार चालवतात.
सोनू सट्टाबाजारातून होणारी कमाई हवालामार्गे दुबई आणि दुबईवरून कराचीला पोहोचवायचा. हे हवाला रॅकेट उद्धवस्त करण्याची तयारी आता पोलिसांनी सुरु केली आहे.
सट्ट्याचा खेळ ऑनलाईन चालायचा. सट्टा लावणाऱ्यांना व्हॉट्सअॅपच्या मार्फत पासवर्ड आणि कोड दिला जायचा. पण पैशांची डिलिवरी आणि दुसऱ्या कारणांमुळे भेटण्यासाठी सट्टेबाजांचा ग्रुप वेगवेगळ्या टीमसाठी काम करायचा.
सट्टेबाजांचा ड्रेसकोडही वेगळा असायचा. पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, टी शर्ट आणि जीन्स, घड्याळं आणि चष्मा असा ड्रेस कोड वेगवेगळ्या ग्रुपला दिला जायचा.
सोनू जलान मुंबईतल्या एका इमारतीत तीन आलीशान फ्लॅटमध्ये राहतो. यातल्या एका फ्लॅटचं महिन्याचं भाडं १,६०,००० रुपये आहे. याचबरोबर सोनूकडे महागड्या गाड्याही आहेत. तसंच सोनूनं अनेक बेनामी संपत्तीमध्येही गुंतवणूक केली आहे. सोनूच्या घरातून ठाणे पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. आयपीएलच्या या मोसमात बेटिंगमधून ५०० कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं या डायरीत लिहिण्यात आलं आहे. फक्त फायनलमध्येच १० कोटी रुपये कमावल्याचा उल्लेख या डायरीत करण्यात आला आहे. या डायरीमध्ये देश आणि परदेशातल्या जवळपास ३० बुकींची नावं कोडवर्डसह लिहिण्यात आली आहेत.
जवळपास १० वर्षांपूर्वीही आयपीएलचा घोटाळा समोर आला होता. याप्रकरणीही सोनूला अटक करण्यात आली होती. २०१२ साली आयपीएल मॅचवेळी सट्टा लावताना सोनूला अटक करण्यात आली होती.