कानपूर : भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीम पार्क मैदानावर खेळला जात आहे. पण या सामन्यापेक्षा स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तिने गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध मिळवली आहे. ही व्यक्ती आहे कानपूरचा 'गुटखा मॅन'. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कानपूर इथे सामना पाहण्यासाठी आलेला हा तरुण गुटखा खात फोनवर बोलत होता. त्याचा स्वॅग पाहून सोशल मीडियावर खूप त्याची चर्चा होत आहे.
गुटखा मॅनचं स्पष्टीकरण
चर्चेत आलेला हा तरुण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्टेडिअमवर सामना पाहण्यासाठी आला होता. पण यावेळी त्याच्या हातात एक बोर्डे होता, ज्यावर लिहिलं होतं, गुटखा खाणं चुकीचं आहे. या तरुणाचं नाव आहे, शोभित पांडे. व्यवसायाने शोभित कपडे व्यापारी आहे. सोशल मीडियावर गुटखा खाताना व्हायरल झालेल्या फोटवर बोलताना शोभितने स्पष्टीकरण दिलं आहे. शोभितने म्हटलं की सामना पहात असताना आपण गुटखा खात नव्हतो. तर आपल्या तोंडात सुपारी होती. तसंच फोटोत बाजुला दिसणारी तरुणी आपली बहिण असल्याचं शोभितने म्हटलं आहे.
स्टेडियमवर गुटखाबंदी?
क्रिकेट स्टेडियममध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. असं असतानाही हा तरुण स्टेडियममध्ये बसून गुटखा खात होता, ज्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले आहेत. काही जणांनी म्हटलंय, कानपूर शहराची सर्वात मोठी ओळख म्हणजे गुटखा आणि याचा पुरावा आंतरराष्ट्रीय सामन्यातच पाहायला मिळाला.
कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर प्रदीर्घ काळानंतर कसोटी सामना खेळवला जात आहे, कानपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने एक अॅडव्हायझरी जारी करून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये अनावश्यक वस्तू घेऊन जाण्यास मनाई असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच एंट्री गेटवर प्रेक्षकांची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. असं असतानाही या तरुणाने गुटखा आत कसा नेला, यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.