Lakshya Sen Want To Be Virat Kohli Of Badminton : युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला भारतीय बॅटमिंटनमधला उगवता तारा असे म्हंटले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदक थोडक्यात हुकले होते. कांस्य पदकाच्या सामन्यात मलेशियाच्या खेळाडूकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. लक्ष्य सेन याने एका मुलाखतीत म्हंटले की तो भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनू इच्छितो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रमाणे लक्ष्य सेन याला बॅडमिंटनमधला सुपरस्टार व्हायचे आहे.
लक्ष्य सेन दिग्गज खेळाडू प्रकाश पादुकोण यांच्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतो. लक्ष्य सेनचं ऑलिम्पिक पदक हुकल्यावर त्याचे कोच प्रकाश पादुकोण यांनी म्हंटले होते की, सरकार खेळाडूंच्या सर्व गरजा पूर्ण करते मग खेळाडूंनी सुद्धा मोठ्या स्टेजवर चांगलं परफॉर्म करायला हवं. लक्ष्य सेन ने टीआरएस पॉडकास्टवर बोलताना म्हंटले की, 'मला आगामी काळात भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनायची इच्छा आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे'. लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरुवातीच्या सामन्यात खूप चांगल्या लयीत दिसला. परंतू तो सेमीफायनलमध्ये डेनमार्कच्या खेळाडूवर विजय मिळवू शकला नाही. तर यानंतर लक्ष्य सेनला कांस्य पदकाच्या सामन्यात सुद्धा पराभव स्वीकारावा लागला.
लक्ष्यस सेन सध्या त्याच्या फिटनेस आणि ट्रेनिंगवर लक्ष देत असून सध्या तो ऑस्ट्रियामध्ये ट्रेनिंग करतो. संपूर्ण फिटनेस मिळवल्यानंतर तो सप्टेंबर पासून टूर्नामेंट खेळताना दिसून येईल. लक्ष्य सेनने एक्सेलसन सोबत त्याच्या मैत्रीबाबत काही गोष्टी पॉडकास्टमध्ये सांगितल्या. लक्ष्य म्हणाला की विक्टरने त्याला खूप प्रेरित केले. लक्ष्याच्या मते, विक्टर ज्या पद्धतीने कोर्टवर आणि बाहेर वागतो ते आश्चर्यकारक आहे. लक्ष्य सेन म्हणाला की तो विराटचा खूप मोठा चाहता आहे. तो विशेषतः कोहलीची मानसिकता, त्याच एग्रेशन आणि इमोशनचा चाहता आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता विक्टर एक्सेलसेननेही लक्ष्यचे कौतुक केले होते. सेमीफायनल मॅच जिंकल्यानंतर विक्टर म्हणाला होता की, लक्ष्य भविष्यात बॅडमिंटनमध्ये मोठे यश मिळवेल. विक्टर म्हणाला की लक्ष्य सेन 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांचा दावेदार असेल.