Pele Health Condition Update: फुटबॉल विश्वाला ब्राझीलियन फुटबॉलपटू पेले यांच्या तब्येतीची चिंता लागून आहे. 82 वर्षीय पेले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु असून साओ पाउलो रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता उपचारांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत. किडनी आणि हृदयासंदर्भात त्रास होत आहे. न्यूज एजेंसी एपीच्या रिपोर्टनुसार, पेलेंचा मुलगा चोल्बी नॅसिमेंटो शनिवारीपासून रुग्णालयात उपस्थित आहे. वडिलांची प्रकृती पाहता चोल्बीन सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे की, "पापा...तुम्ही माझी ताकद आहात."
सप्टेंबर 2021 मध्ये पेले यांच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात नियमित उपचार सुरू आहेत. आता दिग्गज फुटबॉलपटूला हृदयविकाराचा त्रास होत आहे. त्यामुळे केमोथेरपीच्या उपचारांचा अपेक्षित परिणाम होणार नाही अशी चिंता आहे. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळताच मित्र परिवार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहे.
पेलेने ब्राझीलला तिनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958,1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. 1958 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी दोन गोल मारले होते. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत. ब्राझीलसाठी त्यांनी 91 सामने खेळले असून एकूण 77 गोल केले आहेत. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेत्या अर्जेंटिनाचं त्यांनी अभिनंदन केलं होतं. तसेच लियोनेल मेस्सी विजयाचा खरा हिरो असल्याचं सांगत कौतुक केलं होतं.