नवी दिल्ली - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान येत्या 18 तारखेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या असून रणनितीही तयार केली आहे. इंग्लंडमधल्या साऊथेम्प्टनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी 'राज की बात' सांगितली आहे.
साऊथेम्प्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आहे. अशा वातावरणात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करु शकते. अशात खेळपट्टी सुकल्यानंतर फिरकीला साथ मिळेल. त्यामुळे भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना संघात स्थान दिलं जाऊ शकतं. जडेजा आणि अश्विन गोलंदाजीबरोबरच फलंदाजीच्यादृष्टीनेही टीमसाठी उपयुक्त ठरु शकतात. वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशिपनंतर इंग्लंडविरुद्ध होणारी टेस्ट सीरिज वातावरण आणि खेळपट्टीच्यादृष्टीने महत्त्वाची ठरु शकते.
इंग्लंडविरुद्ध टेस्ट सीरिज जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण गावसकर यांच्यामते सराव सामना न खेळताही भारतीय संघ न्यूझीलंड संघाच्या तुलनेत तुल्यबळ आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. यापैकी अनेक खेळाडूंना याआधी इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टीची चांगली जाण आहे.
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं गावसकर यांचं म्हणणं आहे. भारताचे दिग्गज फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना आणि हरभजन सिंग यांच्या इतकाच अश्विनची गोलंदाजी प्रभावी ठरु शकते. अश्विनचा कॅरम बॉल न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकतो.
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही प्रकारात जडेजाची कामगिरी सर्वोत्तम आहे. ज्या ज्या वेळी जडेजाला संघात संधी मिळाली आहे, त्या त्या वेळी जडेजाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जडेजा भारतीय संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरू शकतो असं गावसकर यांनी म्हटलं आहे.