वधूला 'फक्त पाच मिनिटांत आलोssss..', असं सांगत फुटबॉलपटू लग्नमंडपातून निघाला आणि....

त्याच्या या कृतीचं थेट केंद्रीय मंत्रीमहोदयांकडून कौतुक 

Updated: Jan 29, 2019, 11:20 AM IST
वधूला 'फक्त पाच मिनिटांत आलोssss..', असं सांगत फुटबॉलपटू लग्नमंडपातून निघाला आणि.... title=

मलप्पूरम: क्रिकेट या खेळाला सर्वतोपरी महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेल्या भारतात फुटबॉल या खेळाप्रतीही फार आत्मियता पाहायला मिळते. त्यातही दाक्षिणात्य राज्य केरळ आणि फुटबॉलच्या नात्याविषयी काही नवं सांगण्याची गरज नाही. फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी रस्ते आणि घरांवर ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर संघांच्या जर्सीचे आणि देशांच्या राष्ट्रध्वजांचे रंग लावणाऱ्या केरळचं फुटबॉलप्रेम पुन्हा चर्चेत आलं आहे. यावेळी ते चर्चेत येण्यास कारण ठरतोय तो म्हणजे एक विवाहसोहळा आणि अर्थातच नवरदेव. 

केरळचा रिदवान हा त्याच्या लग्नाच्या दिवशीही फुटबॉलप्रती असणारं त्याचं प्रेम आणि वेड लपवू शकला नाही. त्याच्या संघाला फुटबॉल सामन्यात त्याच्या बचाव फळीची आवश्यकता असल्याचं जाणताच रिदवानने थेट लग्न थांबवलं. 'मला पाच मिनिटं द्या मी आलोच', असं म्हणत तो चक्क आपल्या संघाला प्राधान्य देत मैदानावर गेला आणि चर्चेत आलं ते म्हणजे त्याचं फुटबॉल प्रेम आणि या खेळाप्रती असणारी निष्ठा. त्याचं हे वागणं उपस्थितांसाठी आणि समोर असणाऱ्या त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी आश्चर्यजनक होतं. 

सोशल मीडियावरही रिदवानच्या या अंदाजाची चर्चा झाली. फुटबॉलप्रेमींनी त्याची वाहवा केली. इतकच नव्हे तर, क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही रिदवानचं कौतुक करत एक ट्विट केलं. 'रिदवानने त्याच्या लग्नसोहळ्यातूनही पाच मिनिटांचा वेळ काढत फुटबॉल खेळण्याला प्राधान्य दिलं. त्याच्या या आवडीची दाद द्यावी तितकी कमीच', अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी सोबत #KheloIndia हा हॅशटॅगही जोडला. इथवरच न थांबता त्यांनी रिदवानला भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली. 

'एनडीटीव्ही'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रिदवान हा FIFA Manjeri या संघातील खेळाडू असून, मलप्पूरम येथील 7s leagueमध्ये हा संघ नेहमीच चर्चेत असतो. मुख्य म्हणजे ज्या सामन्यासाठी रिदवानने त्याच्या आयुष्यातील इतका मोठा क्षण, लग्नसोहळा ताटकळत ठेवला त्या सामन्यात त्याचा संघ विजयी ठरला. त्यामुळे खऱ्या अर्थाने रिदवान आणि केरळचं फुटबॉल प्रेम पाहता क्या बात! असंच म्हणावं लागेल.